भारत ते श्रीलंका… पोहून

एका सात वर्षांच्या बालकाने भारत ते श्रीलंका हे अंतर पोहत पार करण्याचा विक्रम केला आहे. सात वर्षांपूर्वी हा विक्रम करण्यात आला होता. पण त्यावेळपेक्षा कमी वेळात हे अंतर पार करुन या बालकाने नवा विक्रम केला आहे. या बालकाचे नाव ईशांक असे असून तो भारतातील झारखंड या राज्यातील आहे. त्याने नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्कची सामुद्रधुनी त्याच्या वयाच्या तुलनेत सर्वात कमी कालावधीत पार केली आहे. हे अंतर 29 किलोमीटरचे असून ते पार करण्यासाठी त्याला 9 तास 50 मिनिटे लागली आहेत.

‘युनिव्हर्सल रेकॉर्डस् फोरम’ या संस्थेने ईशांक याला ‘यंगेस्ट अँड फास्टेस्ट पाल्क स्ट्रेट स्वीमर’ हा पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव केला आहे. ईशांक याच्या आधी तामिळनाडूच्या जय जसवंत या बालकाने हा विक्रम केला होता. त्याने त्याच्या वयाच्या 10 व्या वर्षी हे अंतर 10 तास 30 मिनिटांमध्ये पार केले होते. आता ईशांकने त्याचा विक्रम त्याच्यापेक्षा 3 वर्षे कमी वयात आणि 40 मिनिटे कमी वेळेत हे अंतर पार करुन मागे टाकला आहे. ईशांक हा रांची येथे वास्तव्यास असून तो रांची येथील धुर्वा धरणात प्रतिदिन चार ते पाच तास जलतरणाचा सराव करतो. तो प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक अमन जयस्वाल आणि बजरंग कुमार हे आहेत. त्यांनाही आपल्या या शिष्याने गाजविलेल्या पराक्रमामुळे आनंद झाला आहे. या विक्रमासंबंधाने ईशांक याचे देशभरात कौतुक होत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या मध्ये असणारी पाल्कची सामुद्रधुनी उथळ असल्याने येथे पोहणे अवघड मानले जाते. ही सामुद्रधुनी आतापर्यंत अनेक जलतरणपटूंनी पार केली आहे तथापि, त्यांच्यापैकी बहुतेक जलतरणपटू तरुण वयाचे आहेत. बालकांनी ती पार करण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. ही सामुद्रधुनी पार करताना ईशांकसह एक साहाय्यता नौकाही होती. पोहताना जलतरणपटूला अकस्मात काही त्रास होऊ लागला तर त्याला साहाय्यता करण्यासाठी अशी नौका पाठविली जाते. या नौकेत पिण्याचे पाणी, खाण्याचे पदार्थ, अत्यावश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय साधने असतात. समुद्रात पोहताना दिशा चुकण्याची शक्यता असते, अशावेळी ही साहाय्यता नौका जलतरणपटूला योग्य दिशा दर्शविण्याचे काम करते.

Comments are closed.