गाथेच्या शोधात – शिव-पार्वती आणि गंगा

>> विशाल फुटाणे, [email protected]

तामीळनाडूमधील तिरुमीयचूर येथील ललिताम्बिका मंदिरावर एक अतिशय सुंदर शिल्प दिसते जे शिवपार्वती आणि गंगा यांच्याशी संबंधित आहे. ललितांबा त्रिपुरसुंदरी जिची शिल्पे स्त्री आहेतचे सौंदर्य, सामर्थ्य आणि स्वायत्तता यांचा अद्भुत संगम दिसतो.

भारतीय मूर्तीशास्त्र हा केवळ देवदेवतांच्या प्रतिमा घडविण्याचा विषय नाही, तो आपल्या सांस्कृतिक मानसाचा आरसा आहे. प्रत्येक मूर्ती अथवा शिल्प आपणास काहीतरी संदेश देत असते. मूर्तिकला या फक्त सौंदर्यासाठी घडवल्या जात नाहीत, त्या सामाजिक जीवनातील नातेसंबंध, मूल्यव्यवस्था, सत्ता-संतुलन आणि जीवनदृष्टी याचे दर्शन घडवण्यासाठी निर्माण केल्या जातात.

दक्षिण भारतातील अनेक मंदिरांवर विशेषतः तिरुमीयचूर येथील ललिताम्बिका मंदिरावर एक अतिशय सुंदर शिल्प शिव-पार्वती आणि गंगा यांच्याशी संबंधित आहे. या शिल्पात शिव हे नाराज झालेल्या पत्नीची समजूत घालत असून तिची रागाला येऊ नको म्हणून विनवणी करत आहेत. या शिल्पात एक पुराणातील कथा चित्रित केली असून त्यात लपलेला गूढ आणि गहन अर्थ प्रकर्षाने दिसून येतो.

पुराण परंपरेत गंगा ही शिवावर एकतर्फी प्रेम करणारी नदी देवता म्हणून काही कथांमध्ये सूचित होते. गंगा आपल्या पतीवर प्रेम करते ही गोष्ट पार्वतीला माहिती होती. तिचा आपल्या पतीवर असलेला विश्वास अढळ आहे. परंतु जेव्हा गंगा पृथ्वीवर अवतरणार आणि शिव तिला मस्तकात धारण करणार हे समजताच पार्वती नाराज होते. गंगेचे पृथ्वीवर अवतरण हे केवळ भौगोलिक किंवा पौराणिक घटना नसून, ती एक विश्वव्यापी ऊर्जा नियंत्रित करण्याची प्रक्रिया आहे. गंगेचा प्रचंड वेग रोखण्यासाठी शिव तिला आपल्या जटांमध्ये धारण करतात ही प्रतिमा आपण अनेक शिल्पांमध्ये पाहतो, परंतु याचक्षणी पार्वतीच्या मनात निर्माण होणारी खंत, अस्वस्थता किंवा नाराजी ही मानवी भावनांची जाणीव करून देते. देवत्वाच्या उंचीवर असले तरी हे नाते मानवी संवेदनांनीच बांधलेले आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, कैलासातील शिव-पार्वतीचे नातेसंबंध.

मूर्तिकलेतून दिसणारे शिव-पार्वती यांचे नाते आणि वैकुंठातील विष्णू-लक्ष्मी यांची प्रतिमा यात काही मूलभूत फरक दिसतात. लक्ष्मी ही विष्णूच्या पायांशी सेवेत दिसते हे भक्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक असले तरी कैलासातील प्रतिमांमध्ये पार्वती कधीही केवळ सेविका म्हणून दिसत नाही. ती सहचारिणी आहे. अर्धनारीश्वर रूपात तर शिव आणि पार्वती अक्षरश एकरूप होतात. ही संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानातील ‘शिव शक्ती अद्वैत’ दर्शवते. येथे सत्ता, कर्तृत्व आणि अस्तित्व हे समान आहे.

शिल्पकलेतही हा भेद स्पष्ट जाणवतो. अनेक दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये विशेषत तामीळनाडूतील शिल्पपरंपरेत पार्वतीचे रूप केवळ कोमल किंवा लाजरी नसून ती एक शक्तिरूपिणी आहे. दुर्गा, काली, भद्रकाली अशा विविध अवतारांमध्ये ती दानवसंहार करते. या प्रतिमा केवळ धार्मिक कथन नाहीत, त्या समाजातील स्त्रीच्या भूमिकेचा व्यापक अर्थ सांगतात. युद्ध, संघर्ष, न्यायसंरक्षण हे केवळ पुरुषांचे क्षेत्र नाही, हे या मूर्ती ठामपणे सांगतात.

याउलट लक्ष्मीचे रूप घरगुती समृद्धी, ऐश्वर्य आणि स्थैर्य यांचे प्रतीक आहे. ती युद्धात उतरलेली दिसत नाही. याचा अर्थ लक्ष्मी कमी किंवा पार्वती अधिक असा नाही, तर दोन्ही रूपे वेगवेगळ्या जीवनमूल्यांचे प्रतिनिधित्व करतात.

शिव-पार्वतीच्या संसारातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘जबाबदारी आणि नियोजन.’ शिव ‘भोलेनाथ’ म्हणून ओळखले जातात. जगाला सहज वरदान देणारे, विरक्त, परंतु संसार टिकवण्यासाठी केवळ विरक्ती पुरेशी नसते, तेथे नियोजन, दूरदृष्टी आणि कर्तव्यभाव आवश्यक असतो. ही भूमिका पार्वती निभावते. गणेशाला अग्रपूजेचा मान मिळवून देणे किंवा कार्तिकेयाला देवसेनेचा सेनापती बनवणे हे केवळ मातृत्वाचे भावनिक निर्णय नाहीत, तर ते सामाजिक आणि दैवी व्यवस्थेचे सुज्ञ नियोजन आहे. यासंदर्भात शाक्त परंपरेचा विचार केला तर ‘मातृभूमी’ आणि ‘मातृशक्ती’ यांचा गौरव त्यांच्या तत्त्वज्ञान व प्रत्येक कथेतून स्पष्ट दिसतो.

तामीळनाडूतील ललिताम्बा मंदिरावरील शिल्पे या विचारांना दृश्यमान करतात. ललिताम्बा त्रिपुरसुंदरी ही केवळ सौंदर्याची देवी नाही, तर ती ‘श्रीविद्या’ परंपरेतील सर्वोच्च शक्ती आहे. तिच्या शिल्पांमध्ये स्त्राrचे सौंदर्य, सामर्थ्य आणि स्वायत्तता यांचा अद्भुत संगम दिसतो. तिच्या सभोवतालच्या मूर्तीशास्त्रात शस्त्र, वाहन, सहाय्यक देवता हे सर्व तिच्या सर्वांगीण शक्तीचे प्रतीक आहेत.

या सर्व प्रतिमा आणि कथा आजच्या समाजासाठी काय सांगतात? त्या आपल्याला शिकवतात की, नातेसंबंध हे केवळ समर्पणावर टिकत नाहीत, ते परस्पर आदर आणि समानतेवर टिकतात. स्त्राrने केवळ आश्रित राहावे ही कल्पना भारतीय मूळ परंपरेत नाही. उलट तिला स्वत:च्या कर्तृत्वाने उभे राहण्याची प्रेरणा दिली जाते. आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे.

देवता आणि त्यांच्या कथा या केवळ श्रद्धेचा विषय नाहीत, त्या जीवनदर्शन देणाऱया आहेत. शरणागतीइतकीच स्वाभिमानाचीही शिकवण त्यातून मिळते. म्हणूनच भारतीय मूर्तीशास्त्राचा अभ्यास करताना आपण केवळ दगडात कोरलेल्या प्रतिमा पाहत नाही, तर त्या मागील विचारविश्व उलगडतो जिथे शिव आणि शक्ती समानतेने उभे आहेत आणि जिथे प्रत्येकाला स्वत:चे स्थान, सन्मान आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते.

(लेखक पुराततत्व संशोधक आहेत.)

Comments are closed.