लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सोन्याचे दर उच्चांकावरुन 26778 रुपयांनी घसरले

नवी दिल्ली : भारतात एप्रिल मे महिना लग्नसराईचा मानला जातो, या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. 29 जानेवारीला सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. जानेवारीमध्ये सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याचे दर 26778 रुपयांनी घसरले आहेत. तर, चांदीचा दर देखील 143106 रुपयांनी कमी झाला आहे. आयबीजेएकडून सोने आणि चांदीचे दर सोमवार ते शुक्रवार दररोज जाहीर केले जातात. 1 मे रोजी सुट्टी असल्यानं गुरुवारी सोन्याचे दर जाहीर करण्यात आले होते. त्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 148652 रुपये आहे. तर, 23 कॅरेट सोन्याचा दर 148057 रुपये इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 136165 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 111489 रुपये इतका आहे. तर , 14 कॅरेट सोन्याचा दर 86961 इतका आहे.

चांदीचे दर किती रुपयांनी घसरले?

आयबीजेएनुसार 30 एप्रिलला चांदीचा एका तोळ्याचा दर 236882 रुपये इतका होता. चांदीच्या दरामध्ये  उच्चांक गाठल्यानंतर 143106 रुपयांची घसरण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. डॉलर मजबूत होत असल्यानं गुंतवणूकदारांनी सोन्याच्या जागी डॉलरमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळतं. डॉलरच्या दरातील तेजीचा देखील सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम क्रूड ऑईलच्या दरांवर होत असल्यानं, महागाई वाढत आहे. याचा देखील परिणाम सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीवर झाला.

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती, त्यानंतर अचानक सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांनी सोने खरेदी ऐवजी दुसरे पर्याय शोधले.

सराफा बाजारातील सोन्याचे दर

24 कॅरेट- 1,51,230 रुपये प्रति 10 ग्रॅम. सोन्याच्या दरात एका तोळ्याच्या हिशोबाप्रमाणं 330 रुपयांची तेजी आली आहे.

22 कॅरेट- 1,38,500 रुपये प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट सोन्याचे दर 300 रुपयांनी वाढले आहेत.

18 कॅरेट- 1,13,500 रुपये प्रति 10 ग्रॅम. 18 कॅरेट सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढले आहेत.

दरम्यान, सोने आणि चांदीच्या दर देशभर सर्वत्र सारखे नसतात. भारतात सोने आणि चांदीच्या दरांवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. याशिवाय प्रत्येक शहरात मेकिंग चार्जेस वेगवेगळे आकारले जातात. यामुळं सोने आणि चांदीचे दर सर्वत्र सारखे असतील असं नाही, त्यात थोडे फार बदल असू शकतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.