ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज म्हणजेच ३ मे रोजी त्यांचा ७० वा वाढदिवस होता, मात्र या विशेष दिवसाच्या काही तास आधीच त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज संपली.
बोरिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. मोकाशी यांच्या निधनामुळे राज्याच्या माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अभय मोकाशी यांनी आपल्या प्रदीर्घ प्रवासात इंडियन एक्स्प्रेस, मिड-डे आणि फ्री प्रेस जनरल यांसारख्या नामवंत वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले. केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी AAMRAS (Abhay Mokashi’s Academy for Mass Media Research and Studies) या संस्थेच्या माध्यमातून पत्रकारितेचे सखोल संशोधन आणि अभ्यासाला प्राधान्य दिले. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एक उत्तम संपादक आणि तितकेच संवेदनशील मार्गदर्शक गमावल्याची भावना सध्या सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
Comments are closed.