निशांत कुमार यांच्या 'सद्भाव यात्रे'चा शुभारंभ

पिता नितीश कुमारांकडून घेतला आशीर्वाद

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या पश्चिम चंपारण्यच्या पवित्र भूमीवरून ‘सद्भाव यात्रे’चा शुभारंभ करण्यापूर्वी संजद नेते निशांत कुमार यांनी पिता नितीश कुमार यांच्याकडून आशीर्वाद घेतला आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत यांनी रविवारी बिहार यात्रेला प्रारंभा केला आहे.

निशांत यांच्या यात्रेच्या वाहनाचे नाव निश्चय रथ ठेवण्यात आले आहे. निशांत यांच्यासोबत या यात्रेत संजद प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह आणि संजद आमदार श्रवण कुमार असतील.

निशांत यांच्यासमोरील आव्हान

निशांत यांच्यासाठी ही यात्रा मोठे आव्हान ठरणार आहे. निशांत यांच्याकडे पक्षाचे कुठलेच पद नसल्याने त्यांना स्वत:चा राजकीय प्रभाव निर्माण करावा लागणार आहे. निशांत यांनी पदाचा प्रस्ताव नाकारत जनतेदरम्यान जाण्याचा निर्णय घेतला आहे. निशांत हे बिहारमध्ये नितीश कुमारांचे कार्य लोकांसमोर मांडतील. युवा आणि महिलांशी निशांत स्वत: जोडले जातील. निशांत आमचे नेते असून त्यांची यात्रा पक्ष संघटनेला मजबूत करेल असा दावा श्रवण कुमार यांनी केला आहे.

पहिली राजकीय यात्रा

यात्रेच उद्देश गरीब-श्रीमंत, दलित, बिगर-दलित सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा आहे. सर्वांदरम्यान बंधुभावाची भावना असायला हवी. महात्मा गांधींनी सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात चंपारण्यमधूनच केली होती आणि माझ्या वडिलांनीही चंपारण्य येथूनच स्वत:च्या यात्रेची सुरुवात केली होती. आता मी देखील त्यांनीच दाखवून दिलेल्या मार्गावर चालत आहे. यात्रेचा उद्देश पक्ष संघटन मजबूत करणे आहे. ही माझी पहिली राजकीय यात्रा आहे. स्वत:च्या कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांचे विचार जाणून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे निशांत यांनी सांगितले आहे.

Comments are closed.