बंगालमधील फाल्टा येथे २१ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.
मतदारसंघातील सर्व 285 केंद्रांवर पुनर्मतदान : 24 रोजी मतमोजणी
वृत्तसंस्था/ कोलकाता
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान होणार असून निकाल 24 मे रोजी जाहीर केला जाईल. मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनियमितता, ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या तक्रारी आणि हिंसाचाराच्या वृत्तांच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 29 एप्रिल 2026 रोजी पश्चिम बंगालच्या 144-फाल्टा विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर मतदानादरम्यान झालेले गंभीर निवडणूक गुन्हे आणि लोकशाही प्रक्रियेत व्यत्यय आणण्याच्या घटनांचा विचार करून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर 21 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत पुन्हा मतदान होईल. त्यानंतर 24 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालमधील 293 जागांसाठी मतमोजणी सोमवार, 4 मे रोजी होईल. आता फाल्टा या एका जागेवरील निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेला विलंब होणार आहे.
Comments are closed.