होर्मुझमध्ये अमेरिकन जहाजावर इराणचा हल्ला; अमेरिकेच्या ‘ऑपरेशन फ्रीडम’ला उत्तर

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यास मदत करू, असा दावा करणाऱया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने दणका दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत शिरण्याचा प्रयत्न करणाऱया अमेरिकन नौदलाच्या दोन जहाजांवर इराणने क्षेपणास्त्र डागली. त्यामुळे जहाजांना मागे हटावे लागले. अमेरिकेने या भागात ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू केले आहे. त्यास इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

इराणच्या ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने दावा केला, की अमेरिकेच्या नौदलाचे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत शिरत होते. जहाजाला इशारा देण्यात आला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत जहाजाने आगेकूच कायम ठेवली. त्यामुळे इराणने जहाजावर थेट 2 क्षेपणास्त्रs डागली. या हल्ल्यामुळे जहाजाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या सेंट्राल कमांडने मात्र हा दावा फेटाळला आहे. कमांडने ‘एक्स’वर म्हटले आहे की, होर्मुझमध्ये ‘प्रोजेक्ट फ्रीडम’अंतर्गत अमेरिकेची सेना काम करत आहे. इराणने व्यापारी जहाजांवर हल्ला केला. त्यामुळे या जहाजांचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेचे नौदल सरसावले आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्यापासून लांब राहावे, असा इशारा सेंट्रल कमांडचे अधिकारी ब्रॅड कुपर यांनी दिला आहे.

अमेरिकेचे दावे खोटे – इराण

अमेरिकेची दोन व्यापारी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्याचा दावा अमेरिकेने केला होता. तो इराणने खोडून काढला आहे. अमेरिकेचे कोणतेही जहाज किंवा तेलाचे टँकर या भागातून गेलेले नाहीत. अमेरिकेचे दावे खोटे आहेत, असे इराणच्या ‘आयआरजीसी’ने म्हटले आहे.

यूएईच्या तेल टँकरवर ड्रोन हल्ला

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आपल्या एका तेल टँकरवर हल्ला केल्याचा आरोप यूएईने केला आहे. आबू धाबी नॅशनल ऑईल पंपनीशी संबंधित हे टँकर होते. इराणने या टँकरवर दोन आत्मघाती ड्रोनने हल्ला केला. मात्र, त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. असे यूएईने स्पष्ट केले.

विदेशी नौसेनेने होर्मुझमध्ये येऊ नये

इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल अली अब्दोल्लाही यांनी इतर देशांच्या नौसेनांना इशारा दिला आहे. कोणत्याही देशाच्या नौसेनेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या सुरक्षेच्या नावाखाली येऊ नये. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी सावध राहायला हवे. कोणतेही चुकीचे पाऊल जहाजांसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा अब्लोल्लही यांनी दिला आहे.

Comments are closed.