ठाण्याच्या कैलासनगरात बिबट्याची शतपावली, भक्ष्याच्या शोधात राऊंडअप; रहिवासी धास्तावले
रात्रीच्या जेवणानंतर अनेक जण फेरफटका मारतात, पण वागळे इस्टेट परिसरातील कैलासनगरात चक्क एका बिबट्याने भक्ष्यासाठी शतपावली केली. चाळीतील दाट वस्तीतून तो आपल्या परिसरात राऊंडअप करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहताच येथील रहिवाशांची अक्षरशः झोप उडाली. बिबट्याची ही वर्दळ धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कैलासनगरवासीयांनी वनविभागाकडे केली आहे.
ठाणे शहराला लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असून डोंगरमाथ्याजवळ कैलासनगर आहे. येथे अनेक चाळी असून रात्रीच्या वेळी अचानक बिबट्याचा वावर आढळून आला. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब समजताच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर दिसत आहे. आता कैलासनगरमध्येही त्याची एन्ट्री झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ठाणे शहरातील मानपाडा, वर्तकनगर आणि वसंत विहार या भागांतही यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते.
वनविभागाचे आवाहन
नागरिकांनी शांतता राखून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. विशेषतः रात्री उशिरा एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत.
कचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्यप्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही वनविभागाने म्हटले आहे.
Comments are closed.