दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal Election News) निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात पहिल्यांदाच भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवार (4 मे 2026) रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने 294 पैकी तब्बल 206 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. तर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) केवळ 80 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा होत असून, घराघरांत भांडी घासण्याचे काम करणाऱ्या कलिता माझी यांनी औसग्राम मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. कलिता माझी यांना भाजपने औसग्राम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आणि मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला. हा मतदारसंघ बोलपूर लोकसभा क्षेत्राचा भाग आहे. भाजपने राज्यात प्रचंड बहुमत मिळवलेल्या पार्श्वभूमीवर त्यांचा विजय अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. या निवडणुकीत कलिता माझी यांना 1,07,692 मते मिळाली असून त्यांनी टीएमसीचे उमेदवार श्यामा प्रसन्न लोहार यांचा 12,535 मतांनी पराभव केला. त्यांनी घराघरांत जाऊन प्रचार केला होता आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना या विजयातून मिळाले.(Kalita Maji)

पश्चिम बंगालच्या राजकारणात यंदा एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. भाजपच्या कलिता माझी यांनी तृणमूल काँग्रेसचे श्यामा प्रसन्न लोहार यांचा पराभव करत औसग्राम (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघ क्रमांक 273 मधून विजय मिळवला आहे. कलिता माझी यांनी 12,535 मतांच्या फरकाने हा विजय मिळवला. या निवडणुकीत कलिता माझी यांना एकूण 1,07,692 मते मिळाली, तर श्यामा प्रसन्न लोहार यांना 95,157 मतांवर समाधान मानावे लागले. याशिवाय सीपीआय (एम) चे चंचल कुमार माझी यांना 16,478, काँग्रेसचे तापस बराल यांना 2,082 आणि अपक्ष उमेदवार निहार कुमार हाजरा यांना 994 मते मिळाली.

विशेष म्हणजे, राजकारणात येण्यापूर्वी कलिता माझी या चार घरांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला होत्या. त्या दरमहा सुमारे 2,500 रुपये कमवत होत्या. अशा साध्या पार्श्वभूमीतून त्यांनी थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास करत सर्वांना चकित केले आहे.भाजपचे खासदार पी. सी. मोहन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या विजयाचे कौतुक केले. “चार घरांत काम करून केवळ 2,500 रुपये कमावणाऱ्या कलिता माझी यांनी औसग्राम मतदारसंघातून विजय मिळवला. हीच भाजपची ताकद असून, सामान्य नागरिकालाही पुढे जाण्याची संधी मिळते,” असे त्यांनी म्हटले आहे.कलिता माझी यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. दैनंदिन आयुष्यातील अडचणींना सामोरे जात त्यांनी कधीही हार मानली नाही. एक साधी महिला आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर आमदार होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.औसग्रामसारख्या पारंपरिक राजकारण असलेल्या मतदारसंघात त्यांचा विजय केवळ एका जागेचा विजय नसून सामाजिक बदलाचे संकेत मानले जात आहेत. मर्यादित साधनसंपत्ती असूनही मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी ही कथा प्रेरणादायी ठरत आहे.

who is kalita maji : कोण आहेत कलिता माझी?

कलिता माझी या गुस्करा नगरपालिकेतील रहिवासी असून राजकारणात येण्यापूर्वी त्या 3 ते 4 घरांत भांडी घासण्याचे काम करत होत्या. त्या दरमहा सुमारे 3 ते 4 हजार रुपये कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेत होती. त्या गुस्करा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील मझपुकुर पार भागात पती सुब्रत माझी यांच्यासोबत राहतात. त्यांच्या पती आणि मुलाला त्यांच्या यशाचा अभिमान आहे. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि सरकारी शाळांची दयनीय स्थिती यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

kalita maji : 2021 मध्ये पराभव, 2026 मध्ये विजय

कलिता माझी यांनी यापूर्वी 2021 च्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी त्यांचा तृणमूल काँग्रेसच्या अभेदनंदा थंडर यांच्याकडून 11,815 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतरही भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत 2026 मध्ये पुन्हा उमेदवारी दिली आणि यावेळी त्यांनी विजय मिळवला. निवडणूक प्रचारासाठी त्यांनी आपल्या कामातून एक महिन्याची रजा घेतली होती. प्रचारादरम्यान त्यांनी “मला पुन्हा अशी संधी मिळेल, असे कधी वाटले नव्हते. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, ही मोठी जबाबदारी आहे,” असे सांगितले होते. कलिता माझी यांचा हा प्रवास सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.