2 भारतीय पत्रकारांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सायबर फसवणुकीचा प्रकार उघड करण्यासाठी गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2 भारतीय पत्रकारांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जिंकत मोठी कामगिरी केली आहे. आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा यांना डिजिटल पाळत आणि सायबर फसवणुकीचा प्रकार उघड करण्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आनंद आणि सुपर्णा यांना इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. ब्लूमबर्गच्या नताली ओबिको पियर्सन यांनाही या श्रेणीचा पुलित्झर जाहीर झाला आहे.
‘ट्रॅप्ड’ या शीर्षकासह ब्लूमबर्गसाठी तयार करण्यात आलेले यासंबंधीचे वृत्त भारताच्या एका न्यूरोलॉजिस्टची हादरवून टाकणारी कहाणी व्यक्त करते, या न्यूरोलॉजिस्टला डिजिटल अरेस्ट करण्यात आली होती. छायाचित्रे आणि शब्दांच्या अनोख्या मिश्रणातून तयार या वृत्ताने डिजिटल पाळत आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या जागतिक धोक्याला अत्यंत प्रभावीपणे उजेडात आणले होते.
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडून संचालित पुलित्झर पुरस्काराला पत्रकारिता, साहित्य आणि संगीतरचनेच्या क्षेत्रात देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणले जाते.
चीनमध्ये शासकीय पाळत आणि यात अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या भूमिकेवरून स्वत:च्या शोधवृत्तांसाठी असोसिएटेड प्रेसला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. एपीचे पत्रकार डेक कांग, गॅरांस बर्क, बायरन ताउ, अनिरुद्ध घोषाल आणि मुक्त पत्रकार येल ग्राउर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय सूडाशी संबंधित अभियान आणि इंटरनेट मीडियातील दिग्गज कंपनी मेटाच्या जाणूनबुजून स्वत:च्या युजर्सना नुकसान पोहोचविणारे एआय चॅटबॉट्स आणि फसवणुकविषयक जाहिरातींच्या वृत्तांकनासाठी रॉयटर्सला दोन पुलित्झर पुरस्कार मिळाले आहेत.
Comments are closed.