आयपीएल फायनल बंगळुरू नाही तर अहमदाबादला! बीसीसीआयवर का आली ही वेळ? बघा काय आहे नेमकं कारण

बीसीसीआयने आज ६ मे रोजी आयपीएल २०२६ च्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्लेऑफचे सामने २६ मे ते ३१ मे दरम्यान खेळवला जातील. आयपीएल २०२६ चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी होणार आहे. सुरूवातीला अंतिम सामना हा बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, पण आता अंतिम सामन्याचं ठिकाण बदलून अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. पण बीसीसीआयने अचानक सामन्याचं ठिकाण बंगळुरूमधून अहमदाबाद का हलवलं, जाणून घेऊया.

स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यापूर्वी, पहिला क्वालिफायर सामना २६ मे रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होईल. एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ चे सामने न्यू चंदीगड येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे गतविजेते असतानाही बंगळुरूमध्ये एकही एलिमिनेटर किंवा क्वालिफायर सामना भरवण्याची संधी देण्यात आलेली नाही. ‘राजकीय गुंतागुंत’ हे यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आपल्या प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने म्हटलं आहे, “काही कार्यात्मक आणि व्यवस्थापनाशी संबंधित कारणांमुळे टाटा आयपीएल २०२६ चे प्लेऑफ सामने यंदा विशेष बाब म्हणून तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. बंगळुरूला मूळतः अंतिम सामना आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र स्थानिक संघटना आणि प्रशासनाकडून काही अशा अटी पुढे आल्या, ज्या आमच्या ठरलेल्या नियम आणि प्रक्रियेच्या चौकटीबाहेर होत्या. त्यामुळे हे ठिकाण बदलून दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.”

आयपीएलचा अंतिम सामना सलग दुसऱ्यांदा अहमदाबादमध्ये होणार आहे. गेल्या वर्षीही हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवण्यात आला होता, कारण खराब हवामानाच्या अंदाजामुळे तो ईडन गार्डन्सवर होऊ शकला नव्हता.

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला होता. आरसीबीने पंजाबचा पराभव करत प्रथमच विजेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला केवळ ७ बाद १७८ धावाच करता आल्या. परिणामी आरसीबीचा संघ इतिहासात पहिल्यांदाच विजेता ठरला.

Comments are closed.