विराट कोहलीचा माजी सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज अमनप्रीत सिंग गिल याचे बुधवारी (6 मे) वयाच्या 36 व्या वर्षी अकाली निधन झाले. 2007 मध्ये श्रीलंकेत झालेल्या 19 वर्षांखालील त्रिकोणी मालिकेत त्याने विराट कोहली आणि मनीष पांडे यांच्यासोबत हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व करत 5 सामन्यांत 9 बळी मिळवले होते. विशेषतः बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याची कामगिरी संघाला जेतेपद मिळवून देण्यात निर्णायक ठरली होती. त्यांच्या निधनावर हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने ‘X’ वर पोस्ट करत, “अमनप्रीत एक शांत आणि कष्टाळू खेळाडू होता,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ कडून खेळलेल्या अमनप्रीत याने निवृत्तीनंतरही खेळाशी नाते टिकवून ठेवले होते. त्याने पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहत अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले. चंदीगडमधील मनिमाजरा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, एका निष्ठावान क्रिकेटपटूच्या जाण्याने क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Comments are closed.