'वंदे मातरम' ला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : गीताचा अपमान केल्यास दंडासह शिक्षाही होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीत ‘जन गण मन’चा समान दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’चा समान दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच, ‘राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायद्यात’ सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील दाखविण्यात आला

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले वंदे मातरम आता राष्ट्रगीताप्रमाणेच नियम आणि निर्बंधांच्या अधीन असेल. याचा अर्थ, या गीताचा अपमान केल्यास किंवा ते गाण्यात अडथळा आणल्यास शिक्षा होऊ शकते. सध्या, राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांचा अपमान केल्यास तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता या यादीत ‘वंदे मातरम’चाही समावेश केला जाईल. केंद्र सरकारने राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता सरकारी कार्यक्रम, शाळा आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल. ‘वंदे मातरम’ पठणादरम्यान सर्वांना उभे राहणे अनिवार्य असेल. यासंबंधी सुरुवातीचा आदेश 28 जानेवारी रोजी जारी करण्यात आला होता, परंतु तो 11 फेब्रुवारी रोजी माध्यमांना कळला होता.

कायद्यात सुधारणा अन् शिक्षेच्या तरतुदी

‘वंदे मातरम’ला 150 वर्षे पूणे होत असतानाच सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कायद्याच्या कलम-3 मध्ये सुधारणा केली जाईल. या कलमानुसार, जो कोणी जाणूनबुजून राष्ट्रगीत गाण्यात अडथळा आणेल किंवा प्रतिबंध करेल, त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वारंवार गुन्हा केल्यास किमान एक वर्षाची शिक्षा आहे. या सुधारणेनंतर, हेच नियम ‘वंदे मातरम’लाही लागू होतील.

सरकारकडून मार्गदर्शक सूचना

केंद्र सरकारने बुधवारी भारताचे राष्ट्रगीत, वंदे मातरम गाण्याच्या अधिकृत नियमावलीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रमुख शासकीय कार्यक्रमांमध्ये सहा कडव्यांचे आणि अंदाजे 3 मिनिटे 10 सेकंदांचे ‘वंदे मातरम’चे संपूर्ण अधिकृत सादरीकरण किंवा वादन केले पाहिजे. यामध्ये राष्ट्रध्वज फडकवणे, अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांचे औपचारिक आगमन आणि प्रस्थान समारंभ, तसेच अशा कार्यक्रमांमधील त्यांच्या नियोजित भाषणांपूर्वी आणि नंतरचे कार्यक्रम यांचा समावेश आहे.

प्रथम ‘वंदे मातरम’, त्यानंतर ‘जन गण मन’

जर एखाद्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रगीत दोन्ही वाजवले जाणार असतील, तर प्रथम ‘वंदे मातरम’ (राष्ट्रगीत) गायले जाईल, त्यानंतर ‘जन गण मन’ गायले जाईल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. आदराचे प्रतीक म्हणून दोन्ही सादरीकरणादरम्यान उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहावे अशी अपेक्षा आहे.

चित्रपटगृहे आणि चित्रपट प्रदर्शनांसाठी सूट

मंत्रालयाने चित्रपटगृहे आणि चित्रपट प्रदर्शनांसाठी विशिष्ट सूट देखील दिली आहे. या निर्देशानुसार, चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात ‘वंदे मातरम’ वाजवले जात असताना प्रेक्षकांना उभे राहण्याची आवश्यकता नाही, कारण मनोरंजनाच्या ठिकाणी प्रेक्षकांना उभे राहण्यास भाग पाडल्यास त्यांच्या चित्रपट पाहण्याच्या अनुभवात व्यत्यय येऊ शकतो आणि त्यांच्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1875 मध्ये लिहिले, ‘आनंदमठ’मध्ये प्रकाशित

‘वंदे मातरम’ हे भारताचे राष्ट्रगीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले. ते सर्वप्रथम 1882 मध्ये त्यांच्या ‘बंगदर्शन’ या मासिकात त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित झाले. 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात मंचावर ‘वंदे मातरम’ गायले. राष्ट्रीय स्तरावर हे गीत सार्वजनिकरित्या गायले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. याप्रसंगी उपस्थित हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. पुढे, स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ‘वंदे मातरम’ हा नारा बनला.

‘वंदे मातरम’ गायनाला प्रोत्साहन

► शाळा, महाविद्यालय आणि महत्त्वाच्या संस्थात्मक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गाण्याचे गृह मंत्रालयाकडून आवाहन

► विद्यार्थी आणि सामान्य जनतेमध्ये राष्ट्रीय चिन्हांबद्दल जागरूकता आणि आदर वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश.

► बँडद्वारे वंदे मातरम सादर केल्यास ढोलाच्या तालाने किंवा बिगुलच्या आवाजाने गायनाची औपचारिक सुरुवात करावी.

Comments are closed.