कॅनिंग कंपन्यांकडून स्थानिक आंबा बागायतदारांवर अन्याय, दर ५० टक्के कमी करून परराज्यातील आंबा खरेदीचे षडयंत्र; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनात घट झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला असताना कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर पन्नास टक्क्यांनी कमी केल्याने बागायतदार आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कॅनिंग कंपन्या स्थानिक आंबा डावलून परराज्यातील आंबा खरेदी करत असल्याची तक्रार आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),काँग्रेस पक्षाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

शिवसेना उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना देण्यात आले. आंबा खरेदी करणाऱ्या कॅनिंग कंपनीच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी हापूस आंब्याला किमान 60 रूपये दर वाढवून मिळावा. कंपन्यांनी जीआय मानांकन घेतले आहे की नाही ते तपासावे?,शासकीय ९० टक्के अनुदानातून पावस येथे प्रोसेसिंग युनिट प्रकल्प उभारण्यात आला आहे तो प्रकल्प सध्या बंद आहे तो सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची चोरी होत आहे त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत किलोचा आंबा खरेदी करावा अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी, राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे, शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे , कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.