TVK सरकारची तामिळनाडूमध्ये 'विजयी' सुरुवात

थलपथी विजय मुख्यमंत्रिपदी विराजमान : अन्य नऊ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था/ चेन्नई

टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय रविवारी  तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या शपथविधीने तामिळनाडूतील टीव्हीके सरकारसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या विशेष सोहळ्यात विजय यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडूमध्ये 60 वर्षांनंतर द्रविडेतर सरकारची ही सुरुवात आहे. मुख्यमंत्री झाल्यावर विजय यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली. यामध्ये 200 युनिट मोफत वीजपुरवठा करणे, महिला सुरक्षा दल स्थापन करणे आणि अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करणे या आदेशांचा समावेश आहे.

तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख आणि अभिनेते-राजकारणी सी. जोसेफ विजय हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी रविवारी सकाळी 10.15 वाजता तामिळ भाषेत शपथ घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. शपथ घेताना थलपती विजय निर्धारित ओळींच्या पलीकडे बोलू लागल्याने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना थांबवून फक्त लिहिलेली शपथ वाचण्याची सूचना केली.

मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, आधव अर्जुन, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोत्तैयन, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे. हे सर्व विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे आमदार आहेत. तूर्तास मित्रपक्षांच्या कोणत्याही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

थलपती विजय यांनी शनिवारी टीव्हीके, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि आययूएमएलच्या आमदारांची पाठिंब्याची पत्रे राज्यपाल आर्लेकर यांना सादर केली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. विजय यांच्या दोन वर्षे जुन्या टीव्हीके पक्षाने आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकल्या. 1967 नंतर प्रथमच तामिळनाडूमध्ये द्रविडेतर पक्षाचे (डीएमके किंवा एआयएडीएमके) नेते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

29 वर्षीय सेल्वी कीर्तना सर्वात तरुण मंत्री

थलपती विजय यांच्या मंत्रिमंडळात सेल्वी कीर्तना ह्या मंत्री सर्वात तरुण आहेत. त्या 29 वर्षांच्या आहेत. पक्षाचे सर्वात वयस्कर सदस्य पक्षाचे सरचिटणीस एन. आनंद हे असून ते 61 वर्षांचे आहेत. शिवकाशी मतदारसंघाच्या आमदार असलेल्या कीर्तना ह्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला आणि सर्वात तरुण मंत्री आहेत. कीर्तना यांच्या माध्यमातून शिवकाशी मतदारसंघातील जवळपास सात दशकांचे पुरुषप्रधान वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्यांचे तमिळ तसेच हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे.

पहिला आदेश : 200 युनिट मोफत वीज

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदग्रहण केल्यानंतर लगेचच आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. सर्वप्रथम त्यांनी घरगुती ग्राहकांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. आपल्या पहिल्या भाषणात मुख्यमंत्री विजय यांनी ते राजघराण्यातील नाहीत; जनतेने त्यांचे स्वागत करून त्यांना स्वीकारले असल्यामुळे ते खोट्या आश्वासनांनी जनतेची फसवणूक करणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. याचदरम्यान मुख्यमंत्री विजय यांनी मागील द्रमुक सरकारवर राज्यावर 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादल्याचा आरोप केला.

सोहळ्यातील वेगळेपण

शपथविधी सोहळ्यासाठी थलपती विजय पांढरा शर्ट, काळी पँट आणि कोट घालून सहभागी झाले होते. या सोहळ्यादरम्यान विजय यांच्या आई-वडिलांनी हात जोडून नमस्कार करत या क्षणाचा आनंद लुटला. स्टेडियममधील हा त्यांचा पहिलाच शपथविधी सोहळा होता, ज्यात समर्थकांनी टाळ्या वाजवल्या. शपथ घेतल्यानंतर ते सचिवालयात पोहोचले आणि मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

समर्थकांचा जल्लोष

विजय यांच्या शपथविधीनंतर मदुराईमध्ये त्यांच्या चाहत्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला. याप्रसंगी काही महिला समर्थक भावूक झाल्याचेही दिसून आले. दरम्यान, बिजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल थलपती विजय यांचे अभिनंदन केले. ‘विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. मला आशा आहे की नवीन नेतृत्वाखाली तामिळनाडू अधिक उंची गाठेल आणि जलद विकास साधेल.’ अशी पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर केली आहे.

Comments are closed.