पेट्रोलियम पदार्थांचा वापर संयमाने करा.
पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन : विदेशी चलनाची होणार बचत
न्यूज एजन्सी/ हैदराबाद
पश्चिम आशियात वाढता तणाव आणि जगात तीव्र होत चाललेल्या ऊर्जा संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना पेट्रोलियम उत्पादनांचा संयमाने वापर करण्याचे आवाहन रविवारी केले आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या काळजीपूर्वक वापरामुळे देशाकडील विदेशी चलनाची बचत होईल आणि युद्धासारख्या स्थितीचा प्रभावही कमी पडणार असल्याचे मोदींनी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांनी लोकांना वर्षभर लग्नासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहनही केले.
भारत मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादन विदेशातून आयात करतो. अशास्थितीत लोक गरजेपेक्षा अधिक पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर करत असतील तर याचा थेट प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. जग सध्या मोठ्या ऊर्जासंकटाला सामोरे जात असून पश्चिम आशियात जारी तणावामुळे चिंता आणखी वाढली आहे. लोकांनी पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करावा असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
‘वर्षभर सोने खरेदी करू नका’
मी लोकांना वर्षभर लग्नासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोविड-19 महामारीच्या काळात आम्ही वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्स यांसारख्या प्रणाली अवलंबल्या. हळूहळू आम्हाला त्यांची सवय झाली. आज पुन्हा त्या प्रणालींना प्राधान्य देण्याची गरज निर्माण होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
पर्यायांवर वेगाने काम
मागील काही वर्षांमध्ये भारत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये सामील झाला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे काम वेगाने वाढविण्यात आले आहे. सरकार यापूर्वीच देशाच्या प्रत्येक घरापर्यंत एलपीजी पोहोचविण्याचे काम करत होते आणि आता पाइप गॅसला स्वस्त दरांमध्ये उपलब्ध करविण्यावर लक्ष देण्यात येत आहे. याचबरोबर सीएनजी आधारित व्यवस्थेलाही प्रोत्साहन देण्यात येतेय. या सर्व प्रयत्नांमुळे भारत जगातील मोठ्या ऊर्जा संकटाला मजबुतीने सामना करू शकतोय असे वक्तव्य मोदींनी केले आहे.
केंद्रासोबत मिळून काम करावे
कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रे•ाr यांना पेंद्रासोबत मिळून काम करण्याचा सल्ला दिला. लोकशाहीत वेगवेगळ्या पक्षांचे सरकार असणे चुकीचे नाही, परंतु राज्य आणि देशाच्या विकासासाठी मिळून काम करणे आवश्यक आहे. राज्यांनी विकास केला तरच देश पुढील वाढचाल करू शकणार आहे. विकसित भारत 2047 चे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. केंद्र सरकार तेलंगणाच्या लोकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणखी वेगाने काम करत राहणार असल्याचे मोदी म्हणाले.
Comments are closed.