रणवीर सिंग आता दिसणार शिवाच्या भूमिकेत; अमिश त्रिपाठीच्या मेलुहा पुस्तकाचे हक्क 40 कोटींना घेतले विकत
‘धुरंधर’ने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर, सुपरस्टार रणवीर सिंग आणखी ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी तयारी करत आहे. सध्या तो ‘प्रलय’ या झोम्बी-थ्रिलर चित्रपटावर काम करत असलेल्या रणवीरने आता एका नवीन प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे. या नवीन प्रोजेक्टमध्ये रणवीर देवाधिदेव महादेवांची भूमिका साकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणवीरने अमिश त्रिपाठी यांची प्रचंड लोकप्रिय कादंबरी, “द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा,” मोठ्या पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे.
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, रणवीरने अमिश त्रिपाठी यांच्या या गाजलेल्या कादंबरीचे हक्क मिळवले आहेत. त्याने या व्यवहारावर 40 कोटी रुपये खर्च केले आहेत. कादंबरीच्या हक्कांवर खर्च केलेली ही रक्कम आत्तापर्यंतची सर्वाधिक रक्कम मानली जात आहे. एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘मेलुहाच्या मृत्युंजय’वर चित्रपट बनवणार होते, पण त्यांचा हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला नाही. रणवीरने स्वतःला अनेकदा भगवान शिवाचा भक्त म्हटले आहे, त्याला अमिश यांच्या कादंबरीत चित्रित केलेल्या जगात खूप रस होता. शिवाय रणवीरला महादेवांची भूमिका साकारायची होती. त्यामुळेच संजय लीला भन्साळी यांचे मेलुहाच्या मृत्युंजयवरील हक्क संपताक्षणी, रणवीरने तात्काळ संपर्क साधून आपल्या ‘मा कसम फिल्म्स’ या बॅनरसाठी ते हक्क मिळवले,” असे सूत्राने सांगितले.
पाच वर्षांपूर्वी, रणवीर महादेवाची भूमिका साकारण्यासाठी भन्साळी यांच्यावर अवलंबून होता. परंतु आता हक्क त्याच्या हातात असल्याने, ‘मेलुहा’मधील शिवाला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी तो स्वतः दिग्दर्शकाची निवड करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने या प्रोजेक्टसाठी बिर्ला स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे.
सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून, याबाबत पुढील घडामोडी लवकरच समोर येतील. महादेव यांच्यावरील आधारीत रणवीरच्या चित्रपटाचे चित्रीकरण 2028 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.