रबाडाचा राडा; गुजरातने हैदराबादला शंभरीतच केले बाद, जायंट्सची विजयासह अव्वल स्थानावर दिमाखात झेप
गुजरातचे 168 धावांचे आव्हान हैदराबादला अक्षरशः पर्वतासारखे भासले आणि कॅगिसो रबाडाच्या अचूक आणि भन्नाट गोलंदाजीच्या राडय़ामुळे हैदराबादच्या दिग्गजांनी चक्क 86 धावांवरच दम सोडला. गुजरातने सलग पाचव्या विजयाची नोंद करताना हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. आता या विजयानंतर गुजरातने 16 गुणांसह आपले प्ले ऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.
आयपीएलमध्ये षटकार-चौकारांची आतषबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हैदराबादसाठी 169 धावांचे आव्हान फार तुटपुंजे वाटेल, असा अंदाज होता. पण तो अंदाज एक्झिट पोलप्रमाणे पुरता फेल ठरला. मोहम्मद सिराजने ट्रव्हिस हेडला शून्यावरच बाद करत पहिले षटक निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर रबाडाने हैदराबादच्या फलंदाजीचा कबाडा करताना आधी अभिषेक शर्माची दांडी उडवली. मग इशानला टिपले आणि तिसऱया षटकात रविचंद्रन स्मरणची विकेट काढत हैदराबादची 4 बाद 32 अशी दुर्दशा करत गुजरातचा विजयच निश्चित केला. त्यानंतर जेसन होल्डर, प्रसिध कृष्णाने अचूक मारा करत हैदराबादला फार काळ ताटकळत न ठेवताच 14.5 षटकांतच सामना संपवला. हैदराबादचा हा आयपीएल इतिहासातील सर्वात दारुण पराभवही ठरला. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार 28 धावांत 3 विकेट टिपणारा कॅगिसो रबाडा ठरला. होल्डरनेही 3 विकेट घेत आपले योगदान दिले तर प्रसिधनेही 2 विकेट घेत आपली कामगिरी चोख बजावली. हैदराबादच्या एकाही षटकारबादशाहला धावांची विशी गाठता आली नाही. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 19 धावा केल्या.
त्याआधी पॉवर प्लेमध्ये कासवासारखा संथ खेळ करणाऱया गुजरातने डेथ ओव्हरमध्ये सुस्साट खेळ केला. नाणेफेक हरून फलंदाजीला आलेल्या गुजरातची पॉवरप्लेमध्ये दमछाक झाली. या मोसमातील सर्वात संथ सुरुवात करताना त्यांनी 6 षटकांत फक्त 34 धावा काढल्या. त्यात गिल 5 आणि बटलर 7 धावांवर बाद झाले. वाटलं गुजरातचं सगळं संपलं!
पण तिथेच साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर ढाल बनून उभे राहिले. चौथ्या विकेटसाठी दोघांनी डाव सावरला. सुदर्शनने 44 चेंडूंत 5 चौकार, 2 षटकारांसह 61 धावांची खणखणीत खेळी केली.
वॉशिंग्टननेही 20 व्या षटकात अर्धशतक ठोकत गुजरातला 168 धावांपर्यंत नेले. सुंदरने 33 चेंडूंत 7 चौकार, 1 षटकारासह 50 धावा चोपल्या. हीच खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. त्यामुळे गुजरात 168 धावांपर्यंत पोहोचली.
हैदरबादच्या पॅट कमिन्सने कंजूष मारा करताना 4 षटकांत फक्त 20 धावा दिल्या. एक विकेटही टिपला. प्रफुल हिंगेने 3 षटकांत 17 धावांत 2 विकेट मिळवले. साकिब हुसैननेही 2 फलंदाज बाद केले.
Comments are closed.