IPL 2026: 82 धावांच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबादचे कोच भडकले? म्हणाले… ‘हा काळ प्रत्येक संघावर येतो’

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 82 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर एसआरएच गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. संघाच्या नेट रनरेटलाही मोठा फटका बसला.

सामन्यानंतर बोलताना एसआरएचचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी संघाच्या खराब फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली. “आम्हाला माहित होतं की चांगली सुरुवात करणे महत्त्वाचं आहे, पण आम्ही ते करू शकलो नाही. गुजरातने 200 धावा केल्या असत्या तर सामना आणखी कठीण झाला असता. 169 धावांचे लक्ष्य गाठण्याची संधी आमच्याकडे होती, पण सुरुवातीलाच आम्ही दबावाखाली गेलो,” असे व्हिटोरी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी फलंदाजांवर दोष ठेवणार नाही. संपूर्ण हंगामात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रत्येक संघाला स्पर्धेदरम्यान एखादा खराब दिवस पाहावा लागतो. या सामन्यात आमच्यासोबत तेच घडलं.”

व्हिटोरी यांनी गुजरातच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. “त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी आणि राशिद खानने सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. आम्हाला ही आव्हानं माहिती होती, पण त्याचा सामना करण्यात आम्ही अपयशी ठरलो,” असे त्यांनी सांगितले.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 5 बाद 168 धावा केल्या. ज्यामध्ये साई सुदर्शनने 61 तर वॉशिंग्टन सुंदरने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव अवघ्या 86 धावांत आटोपला. गुजरातकडून कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने 2 तर मोहम्मद सिराज आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत एसआरएचची फलंदाजी उद्ध्वस्त केली.

Comments are closed.