Share Market News – शेअर बाजारात दोन दिवसांच्या घसरगुंडीला ब्रेक; तेजीनंतर किरकोळ घसरण
या आठवड्यात सलग दोन दिवस बाजारात मोठी घसरण झाली. बुधवारी बाजाराची सुरुवात होताच या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आणि बाजारात पुन्हा तेजी दिसू लागली. मात्र, दुसऱ्या सत्रात नफावसुली झाल्याने बाजारात कुरकोळ घसरण दिसून आली. मात्र, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 74 हजार आणि निफ्टी 23 हजारांवर असल्याने गुंतवणूकदारांना आगामी काही दिवसात पुन्हा तेजी येण्याची शक्यता वाटत आहे.
शेअर बाजार दुपारी ३ नंतर घसरू लागला. सेन्सेक्स उच्चांकावरून ७०० अंकांनी खाली आला आणि बँक निफ्टी ६९० अंकांनी,तर निफ्टी १७५ अंकांनी खाली आला. बुधवारी निफ्टी सुमारे २३,३६२ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजार दबावाखाली होता. वाढलेल्या विक्रीमुळे निफ्टी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच २३,२६२ वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या किमती, पश्चिम आशियातील तणाव आणि परदेशी विक्री या घटकांनी या ट्रेंडवर प्रभाव टाकला. सकाळी 11.30 नंतर खालच्या पातळीवर खरेदी सुरू झाली. निफ्टी हळूहळू सावरला आणि २३,४०० च्या वर पोहोचला.
दुपारी १२:०० नंतर बाजाराने आणखी गती घेतली. मेटल स्टॉक्समधील खरेदीमुळे निफ्टी २३,५०० च्या जवळ पोहोचला. दुपारी १:०० च्या सुमारास: निफ्टीने दिवसाचा उच्चांकी पातळी म्हणजेच २३,५८२ गाठली. व्हॅल्यू बायिंग आणि जागतिक बाजारातील मजबूत संकेतांनी आधार दिला. दुपारी २:०० ते ३:००: बाजारात थोडी नफावसुली झाली, परंतु निफ्टी २३,४०० च्या वर राहिला. दुपारी ३ वाजता निफ्टी २७.५० अंकांनी म्हणजेच ०.१२% नी वाढून २३,४०७ वर व्यवहार करत होता.
बुधवारी मेटल इंडेक्स २.८१ टक्क्यांनी वाढला आहे. तर आयटी निर्देशांक घसरला आहे. ऑटो आणि निफ्टी मीडिया निर्देशांकही घसरले आहेत. इतर सर्व निर्देशांक वाढले आहेत. मागील ट्रेडिंग दिवशी, मंगळवारी, बाजारात सलग चौथ्या दिवशी विक्री दिसून आली. निफ्टी २३,४०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स १,४५६ अंकांनी, म्हणजेच १.९२% ने घसरून ७४,५५९ वर बंद झाला, तर निफ्टी ४३६ अंकांनी (१.८३%) घसरून २३,३७९ वर आला.
आज आशियाई बाजार घसरणीसह उघडले. जपानचा निक्केई २२५ ०.३३% ने घसरला, तर टोपीक्स ०.२८% ने वाढला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.३६% ने घसरला, तर कोस्डॅक ०.७४% ने घसरला. हाँगकाँगच्या हँग सेंग इंडेक्स फ्युचर्सने घसरणीसह उघडण्याचे संकेत दिले.
तीव्र घसरणीनंतर, सेन्सेक्सला आता ७३,८०० आणि ७४,००० च्या दरम्यान मजबूत आधार मिळत आहे. ७५,००० आणि ७५,२०० च्या पातळीच्या वर विक्रीचा दबाव कायम राहील. सेन्सेक्सने ७५,२०० ची पातळी ओलांडल्यासच जोरदार सुधारणा शक्य आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. निफ्टीने चार्टवर एक मोठी मंदीची कॅंडलस्टिक तयार केली आहे. हे सततच्या घसरणीचे संकेत देते. तात्काळ आधार २३,१५० आणि २३,१०० वर आहे, आणि तात्काळ प्रतिकार २३,६०० वर आहे.
काल अमेरिकेत संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली. एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक विक्रमी उच्चांकाखाली घसरले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजमध्ये किंचित वाढ झाली. इंडस्ट्रियल ॲव्हरेज ५६.०९ अंकांनी, म्हणजेच ०.११% ने वाढून ४९,७६०.५६ वर पोहोचला, तर एस अँड पी ५०० ११.८८ अंकांनी, म्हणजेच ०.१६% ने घसरून ७,४००.९६ वर आला. नॅसडॅक कंपोझिट १८५.९२ अंकांनी, म्हणजेच ०.७१% ने घसरून २६,०८८.२० वर बंद झाला.
Comments are closed.