मणिपूरमध्ये तिघांची गोळ्या झाडून हत्या
कांगपोकपी जिह्यातील घटनेनंतर तणाव : संतप्त रहिवाशांनी महामार्ग रोखला
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरच्या कांगपोकपी जिह्यात बुधवारी थाडू बॅप्टिस्ट असोसिएशनच्या (टीबीए) तीन चर्च नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. इतर पाच जण जखमी झाले. अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी दबा धरून हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर कांगपोकपी आणि आसपासच्या कुकी-बहुल भागात तणाव पसरला. संतप्त रहिवाशांनी दगड आणि लाकडे टाकून राष्ट्रीय महामार्ग-2 रोखला. हा महामार्ग मणिपूरला नागालँड आणि देशाच्या इतर भागांशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
गोळीबारात ठार झालेल्या मृतांमध्ये मणिपूर बॅप्टिस्ट कन्व्हेन्शनचे (एमबीसी) माजी सरचिटणीस रेव्हरंड व्ही. सितलहू यांचा समावेश आहे. इतर दोन मृतांची ओळख रेव्हरंड व्ही. कैगौलुन आणि पास्टर पागौलेन अशी पटली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. मणिपूरमधील चर्चचे नेते आध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शांतता वाटाघाटी, मदतकार्य आणि हिंसाचारग्रस्त भागांमध्ये आदिवासी ख्रिस्ती ऐक्य जपण्यात सक्रिय असतात. या आघाडीवरील नेत्यांचीच हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.