संयुक्त अरब अमिरातीसोबत संरक्षण करार

इंधन वायूचा पुरवठा, महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताने संयुक्त अरब अमिरातीशी संरक्षण करार केला आहे. तसेच, भारताला नैसर्गिक इंधन वायू पुरविण्याच्या कारारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आणखी अनेक महत्वाचे करार करण्यात आले आहेत. यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील संबंध अधिकच दृढ होणार असून भविष्यकाळात द्विपक्षीय व्यापाराही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याला शुक्रवारी प्रारंभ झाला. शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीत आगमन झाल्यानंतर त्यांचे अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. हा दौरा अत्याधिक सफल झाला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्याच्या काळात येथील भारतीय नागरिकांच्या संरक्षणाची व्यवस्था अमिरातीच्या प्रशासनाने उत्तमरित्या केली, अशी प्रशंसाही त्यांनी केली आहे.

महत्त्वाचा संरक्षण करार

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात संरक्षण भागीदारीसंबंधीचा स्वरुपात्मक करार करण्यात आला आहे. या करारामुळे द्विपक्षीय धोरणात्मक आणि संरक्षणविषयक संबंध अधिक बळकट होणार आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी एकमेकांना आवश्यक ते संरक्षणविषयक साहाय्य करण्याची तरतूद या करारात आहे. भविष्यकाळात संयुक्त शस्त्रास्त्र उत्पादन आणि इतर संरक्षण विषयक सहकार्य यांचा दरवाजा या करारामुळे उघडला गेला आहे. भारताचा कोणत्याही आखाती देशसमूहासमवेतचा हा प्रथम संरक्षण करार मानला जात आहे.

इंधन वायूचा पुरवठा होणार

भारताला नैसर्गिक इंधन वायूचा पुरवठा करण्यासंबंधीच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतासाठी एक शाश्वत इंधनवायू स्रोत उपलब्ध होणार आहे. भारताला आपल्या आवश्यकतेच्या 60 टक्के इंधन वायू आयात करावा लागतो. या करारामुळे ही आवश्यकता मोठ्या प्रमाणात भागविली जाणार आहे. खनिज तेलही काही प्रमाणात भारताला पुरविले जाण्याची शक्यता आहे.

धोरणात्मक तेलसाठा करार

भारतात धोरणात्मक खनिज तेल साठा करण्याच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात किंवा संकटकाळात खनिज तेल किंवा इंधन वायू यांचा तुटवडा होणार नाही. सध्याच्या आव्हानात्मक जागतिक स्थितीत या कराराला महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे भारताच्या तेल आणि वायूच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.

नौका दुरुस्ती संकुल स्थापणार

गुजरातमधील वाडीनार येथे नौका दुरुस्ती संकुल स्थापन करण्यात संयुक्त अरब अमिरात भारताला साहाय्य करणार आहे. या प्रकल्पात अमिरातीकडून गुंतवणूकही केली जाणार आहे. तसेच, भारतामधील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये 500 कोटी डॉलर्सची गुंतवणूक संयुक्त अरब अमिरातीने करण्यासंबंधीच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. आरबीएल बँक आणि सम्मान कॅपिटलमध्येही संयुक्त अरब अमिरात गुंतवणूक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाच देशांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरात आणि नेदरलँडस्, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या चार युरोपियन देशांचा दौराही करणार आहेत. द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक, व्यापार, तंत्रज्ञान विकास आणि हस्तांतर, ऊर्जा सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये या देशांशी महत्वाचे करार या दौऱ्यात केले जाणार आहेत. पर्यावरणस्नेही हरित विकास आणि शास्त्रीय तसेच तंत्रवैज्ञानिक संशोधन करारही पेले जाणार आहेत.

हल्ल्यांचा निषेध

अमेरिका आणि इराणच्या संघर्षात संयुक्त अरब अमिरातींवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. असे हल्ले अवांच्छनीय आणि निंदनीय आहेत, असे वक्तव्य त्यांनी संयुक्त अरब अमिरातील आगमन झाल्यानंतर त्वरित केले. असे हल्ले होत असूनही अमिरातीने संयम आणि धीरोदात्तपणा यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले आहे. त्यामुळे संघर्षाची व्याप्ती वाढलेली नाही, ही बाबही त्यांनी आवर्जून नमूद केली.

ऊर्जा सुरक्षेवर भर

ड भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने संयुक्त अरब अमिरातीशी अनेक करार

ड व्यापार, उत्पादन, संरक्षण, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान विकास यांना दिले प्राधान्य

ड भारतात पेट्रोलियमचा धोरणात्मक साठा करण्याच्या दृष्टीने महत्वाचा करार

ड भारताला थेट वायूपुरवठा करण्यासाठी सागरांतर्गत पाईपलाईन प्रकल्प होणार

Comments are closed.