अमेरिकन सैन्याची मोठी कारवाई; ISISचा टॉप कमांडर अबू बिलाल अल मिनुकी ठार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाईची घोषणा केली आहे. अमेरिकन सैन्याने नायजेरियामध्ये केलेल्या विशेष मोहिमेत ISISच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च कमांडर अबू बिलाल अल मिनुकी याचा खात्मा केला आहे. ही मोहीम अमेरिकन लष्कर आणि नायजेरियन सशस्त्र दलांनी अत्यंत गोपनीय आणि धाडसी पद्धतीने पार पाडली. या यशस्वी कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक दहशतवादाविरुद्धच्या लढाईत हा एक मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की, त्यांच्या विशेष विनंतीवरून अमेरिकन सैनिकांनी नायजेरियन दलांच्या सहकार्याने जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक दहशतवाद्याला कायमचे संपवले आहे. आफ्रिकेतील दुर्गम भागात लपून आपण सुरक्षित राहू आणि तेथून कारवायांचे जाळे विस्तारू, असा अल मिनुकीचा समज होता. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अचूक माहितीमुळे त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते आणि योग्य संधी मिळताच ही कठीण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
अबू बिलाल अल मिनुकीच्या मृत्यूमुळे ISISच्या जागतिक नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या कारवायांची शक्ती आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तो केवळ आफ्रिकेतील स्थानिक लोकांसाठीच धोका नव्हता तर, अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचे नियोजनही तो करत होता.
Comments are closed.