खासगी आयुष्यातील ढवळाढवळ खपवून घेणार नाही, सलमान खानचा पॅपराजींना इशारा
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. यावेळी तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नियमितपणे तो सक्रिय आहे. मंगळवारी रात्री तो मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर पॅपराजींवर संतापताना दिसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इन्स्टाग्रामवर सेल्फीसोबत चार पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली.
सलमान खान मंगळवारी रात्री हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एकाला भेटायला गेला होता. तो नेमका कोणाला भेटायला गेला होता. हे कोणाला माहित नाही. मात्र, तो भेटायला जात असताना पॅपराजींनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे सलमान खान कमालीचा संतापला. रुग्णालयाच्या गेटमधून बाहेर पडताना पॅपराजींनी ‘भाऊ, भाऊ,’ ‘सलमान खान,’ ‘मातृभूमी’ असे ओरडायला सुरुवात केली. ज्यामुळे चिडलेल्या सलमानने हातवारे करत त्यांच्या वागणुकीवर तीव्र आक्षेप घेतला. या घटनेनंतर सोशल मीडियावर सलमानने संताप व्यक्त केला. त्याने एकापाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्या पॅपराजींवर जोरदार टीका करत इशाराही दिला.
सोशल मीडियावरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिले की, पॅपराजींना त्यांची उपजीविका मिळवता यावी, यासाठी त्याने नेहमीच प्रयत्न केले आहेत. ज्या पॅपराजींच्या पाठीशी तो उभा राहिला, ज्यांची त्याने काळजी घेतली. आता त्यांनीच रुग्णालयात आपल्या वेदनांचा आनंद घेत पैसै कमवू नयेत, असा इशारा त्याने दिला. पुढील पोस्टमध्ये त्याने अधिक आक्रमक भाषेत ‘भाऊ भाऊ’ करत फोटो महत्त्वाचा आहे की आयुष्य, असा सवाल उपस्थित केला. खासगी जागेतील हस्तक्षेप कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच त्याने पॅपराजींना दिला आहे. तुमच्या घरातील कोणी रुग्णालयात असेल तर, मी अशी प्रतिक्रिया देईन का? पुढच्या वेळी माझ्यासोबत असा प्रयत्न करून बघा, असा दमच त्याने पॅपराजींना भरला आहे.
या संपूर्ण वादाच्या शेवटी सलमानने एक खास पोस्ट लिहिली. त्यात त्याने म्हटले की, मी साठ वर्षांचा झालो असलो तरी लढायला विसरलेलो नाही, हे लक्षात ठेवा, असे सांगत त्याने ‘जेलमध्ये टाकाल, हा हा…’ अशा शब्दांत आव्हान दिले.
सलमान खान अलीकडेच ‘राजा शिवाजी’ चित्रपटात जीवा महालाच्या भूमिकेत पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसला होता आणि आगामी काळात तो ‘मातृभूमी’ या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Comments are closed.