रेल्वेच्या डब्यांना आग कोण लावत आहे?

रेल्वेला मोठ्या कटाचा वाटतोय संशय :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने अलिकडच्या दिवसांमध्ये रेल्वेडब्यांना अचानक आग लागण्याच्या घटनांवरून अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. रेल्वेने बुधवारी या दुर्घटनांना केवळ योगायोग किंवा तांत्रिक खराबी मानण्याऐवजी यामागे एखाद्या ‘कटा’चा संशय व्यक्त केला आहे. आतापर्यंत चाललेल्या चौकशीचे निष्कर्ष ‘असामाजिक घटकां’च्या सहभागाकडे स्पष्ट इशारा करत असल्याचे अधिकृत वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण खुलाशानंतर सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

रेल्वे प्रशासनाने खास स्वरुपात 4 विविध ठिकाणी झालेल्या घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. यात राजस्थानच्या अमरपुरा आणि कोटा येथे समोर  आलेल्या घटना सामील आहेत. याचबरोबर बिहारचे सासाराम आणि पश्चिम बंगालच्या हावडामध्ये देखील रेल्वेंमध्ये भडकलेल्या आगीने या सर्व घटनांमागे एखादा सुनियोजित कट असू शकतो या संशयाला आणखी बळ दिले आहे.

या सर्व घटनांना अत्यंत गांभीर्याने घेतले जत आहे. अमरपुरामध्ये रेल्वेच्या बेडरोल (ब्लँकेट-बेडशीड)ला आग लावण्याचा प्रयत्न झाला होता, तर हावडा येथील घटनेत कोच्या बाथरूममध्ये पेट्रोलमध्ये भिजविण्यात आलेले कापड हस्तगत झाले आहे, ज्यामुळे यामागे कट असल्याचा संशय आणखी बळावला असल्याचे रेल्वेचे सांगणे आहे.

धोकादायक कट

कोटामध्ये एका राजधानी एक्स्प्रेसच्या बाथरुममधून ज्वाळा उठल्या होत्या, तर बिहारच्या सासाराम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उभ्या सासाराम-पाटणा पॅसेंजर रेल्वेच्या एका रिकामी डब्यात अज्ञात इसमाने पेटती गोष्ट फेकली होती. परंतु प्रारंभिक तपासात सासारामच्या घटनेमागे शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण आता यातही तोडफोडीचा पैलू समोर येत आहे.

रतलाममध्ये जळाला रेल्वेडबा

मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या एका एसी कोचमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर रेल्वेने हे वक्तव्य केले आहे. विक्रमगढ आलोट आणि लूनी ऋचा स्थानकांदमयान रेल्वेच्या बी-1 डब्यात आग भडकली होती. या डब्यात 68 प्रवासी होते, सुदैवाने या भयानक दुर्घटनेत कुणीच जखमी झाले नव्हते. आग इतकी भयंकर होती की वेगळे करण्यात आलेल्या डब्यातून धूराचे लोट उठत होते. या मोठ्या घटनेमुळे त्या मार्गावरील रेल्वेवाहतूक प्रभावित झाली होती. कमीतकमी 18 रेल्वेंचे वेळापत्रक बिघडले होते आणि अनेक रेल्वेगाड्यांना विविध स्थानकांवर रोखावे लागले होते.

आरपीएफकडे तपासाची जबाबदारी

सातत्याने घडत असलेल्या या घटनांनंतर रेल्वे प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरपीएफच्या स्पेशल टीम्स प्रत्येक प्रकरणाचा सर्व पैलू विचारात घेत तपास करत आहे. देशाची जीवनरेषा मानण्यात येणाऱ्या रेल्वेजाळ्याला टार्गेट करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध आरपीएफ घेत आहे.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वपूर्ण

सातत्याने घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांनाही अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रवाशांनी सतर्क अन् सुरक्षित रहावे. जर रेल्वे किंवा स्थानकावर कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्या तर कुठलाही विलंब न करता त्वरित रेल्वेचा हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करत माहिती द्यावी असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Comments are closed.