GT vs CSK: गुजरातचा चेन्नईवर 89 धावांनी दणदणीत विजय, सीएसकेचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं
आयपीएलच्या 19व्या हंगामातील 66वा साखळी सामना अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने 89 धावांनी एकतर्फी विजय मिळवला.
सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावत 229 धावांचा डोंगर उभा केला.
गुजरातला शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. गिलने 64 धावा केल्या. त्यानंतर जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी धावांचा वेग कायम ठेवत दुसऱ्या विकेटसाठी 36 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनने 53 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी केली, तर बटलर 57 धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईकडून अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. त्यानंतर 29 धावांपर्यंत संघाचे तीन फलंदाज माघारी परतले.
यानंतर शिवम दुबे याने 17 चेंडूत 47 धावांची झंझावाती खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या बाद झाल्यानंतर चेन्नईच्या विजयाच्या आशाही संपल्या. चेन्नईचा संपूर्ण संघ 13.4 षटकांत 140 धावांवर गारद झाला.
गुजरातकडून कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि राशिद खान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत चेन्नईच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला.
Comments are closed.