अभिषेक बॅनर्जी यांना न्यायालयाचा दिलासा

शाह विरोधातील वक्तव्यावर होणार नाही कारवाई

वृत्तसंस्था/कोलकाता

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कलकत्ता उच्च न्यायालयाकडून गुरुवारी दिलासा मिळाला. प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी बॅनर्जी यांच्याविरोधात कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तृणमूल काँग्रेस महासचिवाने स्वत:च्या विरोधात नोंद एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे.

बॅनर्जी यांच्या वक्तव्याप्रकरणी 5 मे रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील विधाननगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजीव सरकार यांच्याकडून दाखल तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंद झाला होता. अभिषेक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून प्रक्षोभक टिप्पणी केल्याचा आरोप सरकार यांनी केला होता. त्यांची टिप्पणी सार्वजनिक व्यवस्था आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडविणारी होती, असा दावाही सरकार यांनी केला आहे.

निवडणूक निकालानंतर अमित शाह यांनी केंद्रीय सुरक्षेशिवाय जनतेला सामोरे जावे. हा खेळ भाजपने सुरू केला असला तरीही तो तृणमूल काँग्रेसच संपविणार अशी टिप्पणी बॅनर्जी यांनी केली होती. याच टिप्पणीवरून सरकार यांनी पोलीस स्थानकात जात तक्रार नेंदविली होती. तर याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

Comments are closed.