मेट्रो ‘अ‍ॅक्वा लाईन’मध्ये तांत्रिक बिघाड, सकाळी सकाळी मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई मेट्रो-3 ‘अ‍ॅक्वा लाईन’च्या सेवेत शुक्रवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कफ परेडच्या दिशेने धावणारी एक मेट्रो ट्रेन दोन स्थानकांच्या दरम्यान अचानक थांबल्याने संपूर्ण भूमिगत मार्गिकेवरील सेवा जवळपास तासभर विस्कळीत झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत सेवा ठप्प झाल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)सह विविध स्थानकांवर शेकडो प्रवासी अडकून पडले. विशेष म्हणजे, सेवा बंद असताना मेट्रो प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती किंवा घोषणा करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. सेवा नेमकी कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्याने अनेक प्रवाशांनी स्थानकांवरील कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली.

स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रेन मार्गातच थांबल्यामुळे ती पुढे सरकू शकत नव्हती. त्यामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणि स्थानकांमध्ये गर्दी वाढू नये म्हणून सीएसएमटीसह काही स्थानकांवरील प्रवाशांचा प्रवेश थांबवण्यात आला होता.

सेवा खंडित झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावर ‘एक्स’वरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली. “सीएसएमटीहून गेल्या अर्ध्या तासापासून एकही अॅक्वा लाईन ट्रेन सुटलेली नाही. कोणतीही घोषणा नाही, मदत नाही. प्रवाशांना अंधारात का ठेवले जात आहे?” असा सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला.

तर दुसऱ्या प्रवाशाने, “अ‍ॅक्वा लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी हा मोठा त्रास आहे. ३० ते ४० मिनिटांहून अधिक काळ सेवा बंद आहे, मात्र सेवा पूर्ववत कधी होणार याची कोणतीही माहिती दिली जात नाही. किमान वेळेवर सूचना देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

दरम्यान, मुंबई मेट्रो प्रशासनाने बिघाडाचे नेमके कारण किंवा सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नव्हते.

Comments are closed.