झुरळ जनता पक्षाचे 'एक्स' खाते निलंबित

इन्स्टाग्रामवर 6 दिवसांत 1.26 कोटी फॉलोअर्स : भाजपच्या फॉलोअर्सपेक्षा दीडपट अधिक प्रमाण

पक्षाच्या सदस्यत्वासाठी आवश्यक पात्रता

  • बेरोजगारी
  • आळशी असणे
  • ऑनलाइन राहण्याची सवय
  • प्रोफेशनल गरळ ओकण्याची क्षमता

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सरन्यायाधीश सूर्यकांत याच्या झुरळाशी संबंधित टिप्पणीच्या विरोधात सध्यातरी प्रतिकात्मक स्वरुपात निर्माण झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे एक्सवरील अकौंट गुरुवारी बंद झाले आहे. भारतातील स्थानिक नियम, न्यायालयाचे आदेश आणि कायदेशीर तक्रारीच्या आधारावर ही कारवाई केल्याचे एक्सकडून गुरुवारी सांगण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेने देखील स्वत:च्या सोशल मीडिया अकौंटवर सीजेपीचे अकौंट बंद झाल्याची माहिती दिली आहे. सीजेपीच्या सोशल मीडियावर 6 दिवसात लाखो फॉलोअर्स झाले आहेत. गुरुवारी दुपारी 12.55 वाजेपर्यंत हा आकडा इन्स्टाग्रामवर 1.26 कोटीपर्यंत पोहोचला. इन्स्टाग्रामवर भाजपचे 87 लाख आणि काँग्रेसचे 1.33 कोटी फॉलोअर्स आहेत. तर एक्सवर 12 वाजेपर्यंत सीजेपीचे सुमारे 1 लाख 93 हजार फॉलोअर्स हेते, परंतु आता एक्सने पक्षच्या अकौंटला भारतात बंद केले आहे. तर पक्षाचे फेसबुकवर अकौंट नाही. या कथित पक्षाला आता अनेक दिग्गज कलाकारही फॉलो करत आहेत.

पक्षाचा लोगोही जारी

कॉकरोच जनता पार्टीचा नारा ‘सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, लेजी’ आहे. या पार्टीचा लोगोही तयार करण्यात आला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काही बेरोजगार युवांची तुलना झुरळाशी केल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी 15 मे रोजी केला होता. याच पार्श्वभूमीवर हा विचित्र पक्ष स्थापन करण्यात आला आहे.

घोषणापत्र जारी, 5 आश्वासने

  • कॉकरोच जनता पार्टी सत्तेवर आल्यास निवृत्तीनंतर कुठल्याही सरन्यायाधीशाला राज्यसभेवर जाण्याचा सन्मान मिळणार नाही.
  • कुठलाही वैध मतदार वगळल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना युएपीए अंतर्गत अटक केली जाईल, मतदानाचा अधिकार हिरावणे दहशतवादाइतकेच गंभीर.
  • महिलांसाठी 33 टक्क्यांऐवजी 50 टक्के आरक्षण असणार, याकरता खासदारांची संख्या वाढविली जाणार नाही, मंत्रिमंडळातही 50 टक्के आरक्षण.
  • अंबानी अन् अदानींच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्यात येणार. काही न्यूज अँकर्सच्या बँक अकौंट्सची तपासणी करविण्यात येणार.
  • आमदार किंवा खासदाराने पक्षांतर केल्यास त्याच्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाणार. पुढील 20 वर्षापर्यंत सार्वजनिक पद दिले जाणार नाही.

Comments are closed.