नवी मुंबईतील १६ धोकादायक इमारतींचे पाणी तोडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई शहरातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आजपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. वाशी येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या जय महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेचा पाणीपुरवठा आज तोडण्यात आला. या सोसायटीमध्ये असलेल्या १६ इमारतींमध्ये २५६ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या सर्वच इमारती अतिधोकादायक सी-१ वर्गवारीत येत आहेत. पाणी तोडण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला. मात्र त्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोसायटीची नळ जोडणी कापली. या कारवाईमुळे धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने बुधवारी सायंकाळी शहरातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अतिधोकादायक असलेल्या ५२ इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक सर्वच इमारती सी-१ या प्रवर्गात मोडणाऱ्या असल्यामुळे त्या तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने रहिवाशांना पाठवल्या आहेत. वाशी येथील सेक्टर ९ मधील जय महाराष्ट्र सोसायटीमधील १६ इमारतीही अतिधोकादायक सी १ प्रवर्गात मोडणाऱ्या आहेत. या रहिवाशांनाही घरे रिकामी करण्याच्या नोटिसा प्रशासनाने पाठवल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना प्रतिसाद न दिल्यामुळे महापालिकेच्या विभाग कार्यालयाने आज इमारतीची नळ जोडणी तोडली.

महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी आले असता स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोसायटीची नळ जोडणी खंडित केली.

वाशीमधील जय महाराष्ट्र सोसायटीमध्ये २५६ कुटुंबे वास्तव्य करतात. महापालिका प्रशासनाने नळ जोडणी तोडल्यामुळे या कुटुंबांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

या सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर आता वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कंपनीला पत्र देण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पाण्यापाठोपाठ वीजपुरवठा खंडित झाला तर सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या २५६ कुटुंबांची मोठी अडचण होणार आहे.

Comments are closed.