ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का, तुलसी गबार्ड यांनी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला एक मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा भाग असलेल्या तुलसी गबार्ड यांनी हा निर्णय त्यांच्या पतीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तुलसी गबार्ड यांचे पती अब्राहम यांना हाडांच्या एका अत्यंत दुर्मिळ कर्करोगाचे नुकतेच निदान झाले आहे. या गंभीर आजाराशी लढताना आपल्या पतीला पूर्ण वेळ देता यावा, यासाठी त्यांनी हे महत्त्वाचे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा राजीनामा ३० जून २०२६ पासून लागू होणार आहे.

गबार्ड यांनी आपल्या राजीनामा पत्रात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या राजीनामापत्रात लिहिले आहे की, “तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात आणि गेल्या दीड वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक कार्यालयाचे नेतृत्व करण्याची जी संधी दिलीत, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पण दुर्दैवाने मला राजीनामा द्यावा लागत आहे. माझ्या पतीला हाडांच्या एका अत्यंत दुर्मिळ कर्करोगाचे निदान झाले आहे.”

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तुलसी गबार्ड यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.