Ahilyanagar News – डबल महाराष्ट्र केसरीला आश्वासनांचा फटका; नोकरी नसल्याने संसार अधांतरी, महायुतीच्या मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले
अकोलेच्या मातीत आणि नाशिक, भगूर, पुण्याच्या तालीमीतून घडलेला डबल महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर हा नावाजलेला कुस्तीगीर आजही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर मंचावरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री दादा भुसे यांनी सदगीर यांना नोकरीचे आश्वासन दिले होते. याबाबतची फाईलही पुढे सरकल्याचे समजते. मात्र, व्यासपीठावरील घोषणांची हवा खाली उतरताच दिलेली आश्वासनेही विरल्याचा अनुभव महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना आल्याची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 31 व्या वर्षात पदार्पण करणारे सदगीर यांनी सिन्नरमध्ये आधुनिक कुस्ती तालीम उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. अनेक युवकांना कुस्ती क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सदगीर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी या बीएएमएस झालेल्या असून शासकीय वैद्यकीय सेवेत कार्यरत होत्या. 10 मे रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या दाम्पत्याने पुढेही कुस्ती आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकीकडे फडात दंड थोपटून राज्याला मानाचा किताब मिळवून देणाऱ्या पैलवानाच्या गळ्यात डबल केसरीची माळ पडते. मात्र, असं असूनही नोकरीसाठी त्याला प्रतीक्षा करावी लागते, ही शोकांतिका असल्याची भावना कुस्ती वर्तुळातून व्यक्त होत आहे.
नावलौकिक मिळविलेल्या उच्चस्तरीय खेळाडूंनाच दिलेला शब्द महायुतीचे मंत्री-संत्री पाळत नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवालही कुस्ती जगतात उपस्थित केला जात आहे. 1 जून रोजी वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर सिन्नर येथे नव्या तालीम संकुलाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या मातीतल्या खेळाडूंना आवश्यक त्या पातळीवर राजकीय पाठबळ मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. 2020 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली होती. त्यामध्ये लातूर येथील शैलेश शेळकेंवर मात करत त्यांनी पहिले विजेतेपद पटकावले. तर 2026 मध्ये 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रोमांचक अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून त्यांनी डबल केसरीचे विजेतेपद पटकावले. हा पराक्रम करणारे ते सातवे पैलवान ठरले. विजयानंतर त्यांना प्रतिष्ठित रौप्य गदा, फॉर्च्युनर कार आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले असले तरी महायुतीच्या मंत्री संत्र्यांनी नोकरीचा दिलेला शब्द मात्र हवेतच विरून गेला .
Comments are closed.