टीम इंडियात संधी नाही, पण आयपीएलमध्ये साई सुदर्शन ठरतोय सुपरस्टार

टीम इंडियासाठी एकही धाव न करता आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे साई सुदर्शन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून स्वतःला सिद्ध करण्याची संधी न मिळालेला हा युवा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये मात्र गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. यंदाच्या हंगामातही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.

साई सुदर्शनने 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. पहिल्या हंगामात मर्यादित संधी मिळाल्यानंतरही त्याने स्वतःची छाप पाडली. त्यानंतर प्रत्येक मोसमात त्याच्या फलंदाजीत सातत्याने सुधारणा दिसून आली. 2024 पासून त्याने प्रत्येक हंगामात किमान एक शतक झळकावले आहे. आतापर्यंत 54 सामन्यांत त्याने 2431 धावा केल्या असून, त्यात 3 शतकं आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.

2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध साई सुदर्शनला भारतासाठी टी20 पदार्पणाची संधी मिळाली. त्या सामन्यात शुभमन गिल कर्णधार होता. अभिषेक शर्माच्या शतक आणि रुतुराज गायकवाडच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 100 धावांनी विजय मिळवला. मात्र साईची फलंदाजी आलीच नाही. त्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात दिसलेला नाही.

साई सुदर्शन यंदाही ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 2025 मध्ये त्याने 15 सामन्यांत 759 धावा करत ही कॅप जिंकली होती. यंदा 14 सामन्यांत त्याने 638 धावा ठोकल्या आहेत. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचल्याने त्याला अजून सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तो यंदाही धावांचा नवा विक्रम करतो का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Comments are closed.