बांगलादेशी त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी सीमेवर गर्दी करतात.
शुभेंदु यांच्या डिटेक्ट, डिलिट, डिपोर्ट इशाऱ्यानंतर खळबळ : कारवाईच्या भीतीमुळे परतण्याचा निर्णय
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांनी अवैध घुसखोरांना ‘डिपोर्ट’ (देशातून हाकलण्याचा) आदेश दिल्यावर खळबळ उडाली आहे. बंगालमध्ये स्थायिक झालेल्या अवैध बांगलादेशींमध्ये यामुळे चिंता फैलावली आहे. तर अटक आणि कारवाईपासून वाचण्यासाठी बांगलादेशींनी पलायन सुरु केले आहे. स्वरुपनगरमध्ये भारत-बांगलादेश सीमेनजीक मंगळवारी या घुसखोरांची मोठी गर्दी दिसून आली. स्वत:च्या सामग्रीसह हे बांगलादेशी सीमेवर एकत्र झाले, गर्दी वाढल्याने तेथे सुरक्षा वाढवावी लागली असून स्थिती पाहता बीएसएफ आणखी सतर्क झाले आहे.
इतर देशांमधून आलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या घुसखोरांना न्यायालयासमोर हजर करण्याऐवजी थेट बीएसएफकडे स्वाधीन करावे असा निर्देश मुख्यमंत्री अधिकारी यांनी पोलीस विभाग आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
हकीमपूर सीमेवर गर्दी
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर सीमा क्षेत्रातही बांगलादेशी मायदेशी परतण्यासाठी मोठ्या संख्येत पोहोचले. राज्य सरकार अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई तीव्र करत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अवैध घुसखोरांना थेट बीएसएफच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया बंगालमध्ये तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. स्वरुपनगर सीमेवरही मोठ्या संख्येत बांगलादेशी स्वगृही परतण्यासाठी एकत्र आले आहेत.
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई
बांगलादेशी घुसखोर हावडा रेल्वेस्थानक किंवा अन्यत्र पकडला गेल्यास त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार नाही. तर थेट बीएसएफच्या ताब्यात घुसखोराला सोपविण्यात येणार आहे. बीएसफच्या बेनापोल-पेट्रोपोल सीमा चौकी किंवा बशीरहाटमधील चौकीच्या ठिकाणी घुसखोरांना आणले जाणार आहे. या दोन्ही चौक्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात आहेत.
डिटेक्ट, डिलिट, डिपोर्ट धोरण
अवैध बांगलादेशींची ओळख पटवा, त्यांना मतदारयादीतून हटवा आणि निर्वासित करा असा आदेश मुख्यमंत्री अधिकारी यांनी दिला आहे. बंगाल सरकार याच धोरणावर काम करत आहे. या धोरणाचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान दिले होते. भाजपच्या मुख्य आश्वासनामध्ये घुसखोरी रोखण्यासह राज्याला अवैध घुसखोरांपासून मुक्त करण्याचा मुद्दा सामील होता.
मालदामध्ये होल्डिंग सेंटर
पश्चिम बंगालमधील मालदा येथे आता विदेशी घुसखोरांसाठी एक होल्डिंग सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आता बांगलादेशी घुसखोरांना ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इंग्लिश बाजारच्या चंदन पार्कमधील या होल्डिंग सेंटरला अनेक स्तरीय सुरक्षा पुरविण्यात आली आहे. येथे सीसीटीव्ही देखरेख, पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि नागरी स्वयंसेवकांना तैनात करण्यासोबत भोजन आणि देखभालीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Comments are closed.