Ratnagiri News – सोनवडे-कोसुंब घाटीत गव्यांचे दर्शन!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागात वन्यजीवांचा वावर कमालीचा वाढला असून, आता चक्क मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर गव्यांचे कळप दर्शन देऊ लागले आहेत. मुचरी येथील रहिवासी योगेश सप्रे हे देवरुख येथे जात असताना, सोनवडे-कोसुब घाटी मार्गावरील कोसुब बौद्ध वाडीनजिकच्या एका मोठ्या वळणावर अचानक १० ते १२ गवे आणि एका छोट्या पाडसाने मुख्य रस्ता रोखून धरला. गव्यांच्या या महाकाय कळपाने रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भरदिवसा घडलेल्या या थरारक प्रसंगामुळे परिसरात आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

मुचरी येथील योगेश सप्रे हे आपल्या स्कूटरने सोनवडे-कोसुब घाटीमार्गे देवरुखच्या आठवडा बाजाराकडे निघाले होते. कोसुब बौद्ध वाडीच्या थोड्या अगोदर असलेल्या एका मोठ्या धोकादायक वळणावर अचानक त्यांच्या समोर १० ते १२ अजस्त्र गवे आले. अचानक समोर आलेल्या या अवाढव्य प्राण्यांना पाहून सप्रे यांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. क्षणभर काय करावे, हे न सुचल्याने त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखीत गाडी जागीच थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गव्यांचा संपूर्ण कळप देखील जागच्या जागी थांबून थेट सप्रे यांच्याकडेच रोखून पाहात होता. अत्यंत थरारक आणि भीतीदायक वातावरणातही सप्रे यांनी धीर न सोडता, अत्यंत सावधगिरीने उभ्या असलेल्या ठिकाणाहूनच या गव्यांचे व्हिडिओ आणि काही छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

हा मार्ग वाहनचालकांसाठी महत्त्वाचा असतानाही, गव्यांचा कळप तिथून हलण्याचे नाव घेत नव्हता. बराच वेळ झाला तरी हे वन्यप्राणी संपूर्ण रस्त्याची रुंदी व्यापून उभे होते. वन्यप्राण्यांचा मूड कधी बदलेल याचा नेम नसल्याने आणि वाढता धोका ओळखून, अखेर योगेश सप्रे यांनी तिथून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ते काही अंतर आलेल्या मार्गाने माघारी फिरले.

काही अंतरावर मागे गेल्यावर सप्रे यांना सोनवडे बाजूकडून येणारे शाम किंजळे भेटले. सप्रे यांनी त्यांना पुढे असलेल्या धोक्याची तत्काळ कल्पना दिली. यानंतर दोघांनीही एकत्रीतपणे पुन्हा त्याच वळणावर जाण्याचे ठरवले. घटनास्थळी पोहोचताच दोघांनीही गव्यांना हुसकावून लावण्यासाठी धीर एकवटून जोरजोरात ओरडण्यास आणि आवाज करण्यास सुरुवात केली. मानवी आवाजाचा जोर आणि आरडाओरडा ऐकल्यानंतर अखेर गव्यांचा कळप बिथरला आणि त्यांनी रस्त्यावरून काढता पाय घेत जंगलाच्या दिशेने धाव घेतली. गवे जंगलात गेल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

या घटनेनंतर संपूर्ण सोनवडे-कोसुब घाटी परिसरात गव्यांच्या वावराची जोरदार चर्चा सुरू आहे. हा रस्ता वळणावळणाचा आणि डोंगराळ भागातून जात असल्यामुळे दुचाकीस्वारांना समोरील परिस्थितीचा अंदाज येत नाही. सुदैवाने योगेश सप्रे यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आणि शाम किंजळे यांच्या वेळेवर मिळालेल्या साथीमुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनधारकांनी, विशेषतः दुचाकीस्वारांनी वळणावर वाहने सावकाश चालवावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन आता स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे.

Comments are closed.