तोडगा निघाला तर ठीक अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचा पुढचा टप्पा पुण्यात असेल, रोहित पवारांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मंगळवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भव्य ‘क्रांती महामोर्चा’ काढत आपली मोठी ताकद दाखवून दिली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत आता सरकारने योग्य तोडगा काढावा, अन्यथा या क्रांती महामोर्चाचा पुढचा टप्पा पुण्यात धडकणार असल्याचा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा धसका राज्य सरकारने घेतला आहे. याच कारणामुळे आज राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, तेथे केंद्रीय गृहमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करत आहे.

आमदार रोहित पवार यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, दिल्लीतील या चर्चेतून आज जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघाला तर ठीक, अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचा पुढचा टप्पा पुण्यात आयोजित केला जाईल आणि सरकारने याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

Comments are closed.