आमच्या देशातून चालते व्हा! अमेरिकेत हिंदुस्थानी दांपत्याला वर्णद्वेषी वागणूक; व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेत स्थायिक असलेल्या किंवा तेथे फिरायला गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना वर्णद्वेषी वागणुकीला सामोरे जावे लागल्याची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अमेरिकन नागरिकाने रस्त्यावरून जाणाऱ्या हिंदुस्थानी दांपत्याला अडवून हुज्जत घातली आणि थेट तुमच्या देशात परत जा, आमच्या देशातून चालते, असे म्हटले. विशेष म्हणजे या अमेरिकन व्यक्तीने स्वतःच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यानंतर जगभरातून त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
टोन नावाच्या एक्स युझरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, हा व्यक्ती आपल्या कारमध्ये बसून रस्त्याने जाणाऱ्या एका हिंदुस्थानी दांपत्याला थांबवतो. सुरुवातीला तो त्यांना तुम्ही हिंदुस्थानातून आला आहात का? असा प्रश्न विचारतो. दांपत्याने हो असे उत्तर दिल्यानंतर, तो त्यांना तुम्हाला अमेरिका आवडते की हिंदुस्थान? दोन्हीपैकी कोणता देश चांगला आहे? असे प्रश्न विचारतो
या अनपेक्षित प्रश्नांवर हिंदुस्थानी दांपत्याने अत्यंत सुसंस्कृत आणि मुत्सद्दी उत्तर दिले. दोन्ही देश आपापल्या जागी उत्तम आहेत. हिंदुस्थानात आमचे कुटुंब आहे, त्यामुळे त्याचे वेगळे महत्त्व आहे आणि प्रत्येक देशाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य असते, असे त्यांनी शांतपणे सांगितले.
दांपत्याचे उत्तर ऐकूनही त्या व्यक्तीचा राग शांत झाला नाही. उलट त्याने थेट द्वेष पसरवण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हिंदुस्थान जर इतका चांगला आहे, तर तुम्ही तिथेच का राहत नाही? अमेरिकेत कशाला येता? यावर दांपत्याने आम्हाला जग फिरायचे आहे, नवीन गोष्टी अनुभवायच्या आहेत, असे सांगितले. त्यानंतर मर्यादा ओलांडत तो अमेरिकन नागरिक म्हणाला, नाही, आम्हाला तुम्ही इथे नको आहात. तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल. समजले? माझ्या देशातून चालते व्हा!

मी काही H-1B व्हिसाधारक हिंदुस्थानी नागरिकां भेटलो आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली! अशा अत्यंत आक्षेपार्ह कॅप्शनसह या विकृत व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. जगभरातील युझर्सनी या अमेरिकन नागरिकाच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे.
Comments are closed.