मोखाड्याच्या चास आरोग्य केंद्राला टाळे, रुग्ण वाऱ्यावर… नातेवाईकांचीही फरफट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मोखाडा तालुक्यातील चास येथील आरोग्य उपकेंद्र मंगळवारी दुपारपर्यंत बंद होते. आरोग्य केंद्राला अक्षरशः टाळे ठोकून डॉक्टर, कर्मचारी गायब होते. तीन वाजेपर्यंत कुणीच दवाखान्याकडे फिरकले नव्हते. त्यामुळे रुग्णसेवा वाऱ्यावर होती. नातेवाईकांचीही फरफट झाली. रुग्णांना मोखाडा शहरात जाऊन उपचार घ्यावे लागले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या बेफिकीरीविरोधात प्रचंड संताप होत आहे.

चास आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी रोज रुग्णांची गर्दी असते, मात्र मंगळवारी उपकेंद्र बंद होते. उपकेंद्राच्या मुख्य गेटला व दवाखान्याला कुलूप असल्याचे पाहून ग्रामस्थांनी व्हिडिओ चित्रीकरणासह छायाचित्रे काढून ही बाब सोशल मीडियावर व्हायरल केली. सकाळपासूनच आरोग्य सेवा बंद असल्याने रुग्ण व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर, नर्स, कर्मचारी असा स्टाफ कुणीच नव्हते. त्यामुळे हा दवाखाना आहे की धर्मशाळा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. तालुक्यात मुळातच सक्षम आरोग्य सेवेचा अभाव आहे. त्यातच एकाच वेळी संपूर्ण आरोग्य कर्मचारी अनुपस्थित राहून उपकेंद्र कुलूपबंद ठेवण्यात आल्याने प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

डॉक्टर रजेवर, नर्स मीटिंगला
आरोग्य अधिकारी डॉ. दीपक साळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रजेवर असल्याचे सांगितले, तर दोन्ही स्टाफ नर्स यांची मीटिंग असल्यामुळे त्यादेखील उपकेंद्रात अनुपस्थित होत्या. मीटिंग संपवून दुपारी सव्वातीन वाजता त्या उपकेंद्रात पोहोचल्यावर रुग्णसेवा सुरू झाली.

Comments are closed.