दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका देशातील विविध केंद्रांवर कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-युजी (CUET UG 2026) परीक्षेदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावरून आता देशातील राजकारण कमालीचे तापलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या गोंधळावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “NEET, CBSE, SSC आणि आज CUET… चार परीक्षा, एक कोटी मुले, पण एकही परीक्षा प्रामाणिकपणे आणि सुरळीत पार पडली नाही,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi X Post : ‘ज्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करताय, तीच हिशोब करेल’

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) पोस्ट करत केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, “दावे विश्वगुरूचे, पण देशात एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही. मोदीजींनी देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे. ज्या तरुण पिढीचे भविष्य तुम्ही अशा प्रकारे अंधारात ढकलून उद्ध्वस्त करत आहात, तीच पिढी भविष्यात तुमच्या या कारभाराचा पूर्ण हिशोब करेल.”

CUET UG 2026 Technical Glitch : अनेक केंद्रांवर तांत्रिक बिघाड, परीक्षा खोळंबली

CUET-UG 2026 परीक्षेदरम्यान देशातील अनेक महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांवर अचानक गंभीर तांत्रिक समस्या (Technical Glitch) समोर आल्या. यामुळे नियोजित वेळेत परीक्षा सुरू होऊ शकली नाही आणि विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर तासनतास ताटकळत राहावे लागले.

नुकत्याच झालेल्या NEET, CBSE आणि SSC परीक्षांमधील विविध वादांनंतर आता देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या CUET मध्येही असा गोंधळ झाल्याने भारतीय परीक्षा पद्धतीवर (Exam System) पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संपूर्ण विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सरकारला धारेवर धरले आहे.

NTA Clarification Helpline : नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे स्पष्टीकरण आणि माफी

या वाढत्या वादानंतर परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही केंद्रांवर परीक्षेला उशीर झाला असला, तरी सर्व तांत्रिक त्रुटी वेळेत दूर करण्यात आल्याचं एनटीएनं म्हटलं आहे.

सकाळच्या शिफ्टमधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा पूर्ण वेळ पेपर लिहिण्यासाठी देण्यात आला असून, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही, असा दावा एजन्सीने केला आहे.

एनटीएने या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या त्रासाबद्दल जाहीर खेद व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 91-11-40759000 हा हेल्पलाईन क्रमांक आणि cuet-ug@nta.ac.in हा ईमेल आयडी जाहीर केला आहे.

NTA Exam Schedule : 31 मे पर्यंत चालणार परीक्षा

अतिशय मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसत असल्यामुळे आणि विषयांचे अनेक वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असल्यामुळे CUET-UG परीक्षा देशात अनेक दिवस आणि वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये आयोजित केली जाते. चालू वर्षामध्ये ही CUET-UG 2026 ची मुख्य परीक्षा 11 मे पासून सुरू झाली असून, ती 31 मे 2026 पर्यंत देशभरात आयोजित केली जाणार आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात आलेल्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमधील तणाव वाढला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.