Interesting Facts : टी-शर्टमधील ‘T’ चा नेमका अर्थ काय?
आपण रोज वापरत असलेल्या अनेक वस्तूंबद्दल काही गोष्टी इतक्या सामान्य वाटतात की त्यामागची खरी कहाणी जाणून घेण्याचा विचारही मनात येत नाही. टी-शर्ट हे त्याचं उत्तम उदाहरण. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जवळपास प्रत्येकाच्या कपाटात टी-शर्ट असतो. पण या नावातील ‘T’ नेमकं कशासाठी वापरलं जातं, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
अनेकांना वाटतं की टी-शर्टमधील ‘T’ चा संबंध शब्दाशी आहे, पण तसं नाही तर त्याच्या आकाराशी आहे. जेव्हा हा कपडा किंवा एखादा टी-शर्ट सपाट पसरवून ठेवला जातो, तेव्हा तो इंग्रजीतील ‘T’ अक्षरासारखा दिसतो. याच वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘T-Shirt’ हे नाव मिळालं.
आज फॅशनचं प्रतीक मानला जाणारा टी-शर्ट सुरुवातीला मात्र केवळ अंतर्वस्त्र म्हणून वापरला जात होता. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार, खाणकामगार आणि नौदलातील कर्मचारी हलका व आरामदायी असल्यामुळे त्याचा वापर करत असत. त्यानंतर 1913 मध्ये अमेरिकन नौदलाने टी-शर्टला आपल्या अधिकृत गणवेशाचा भाग बनवलं आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली.
हॉलीवूडमुळे आणखी ट्रेंडमध्ये
हॉलीवूड चित्रपटांमधील लोकप्रिय कलाकारांनी टी-शर्ट परिधान केल्याने तो तरुणाईच्या स्टाईल स्टेटमेंटचा भाग बनला. त्यानंतर टी-शर्टने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज राउंड नेक, व्ही-नेक, पोलो, ओव्हरसाईज आणि ग्राफिक प्रिंटेड अशा असंख्य प्रकारांमध्ये तो उपलब्ध आहे.
Comments are closed.