लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुती सरकार महाग पडणार, विजय वडेट्टीवार यांची टीका

विधान सभा निवडणुकीआधी महायुती सरकारने वाजत गाजत लाडकी बहिण योजना आणली.सत्ता आल्यावर मात्र याच बहिणींचा विश्वासघात सरकारने केला आहे. 80 लाख बहिणींना अपात्र ठरवून सरकारने जबाबदारी झटकल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

निवडणुकीत मतांसाठी लाडकी बहिण,त्यांच्या मताचा वापर महायुती सरकारने केला.मोठे इव्हेंट केले पण आता मात्र सत्ता मिळाल्यावर भाऊ मजा मारत आहे,महाराष्ट्र लुटत आहे आणि लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडून दिले आहे.या बहिणींचा तळतळाट या महायुती सरकारला महाग पडेल अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली.

विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या प्रवृत्तीवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजपला स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपती अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.

भाजपने विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना का संधी दिली,यावर उपरोधिक टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता, मात्र आता भाजपच काँग्रेसयुक्त होत चालली आहे. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले असल्याने भाजपची मूळ ओळखच बदलली आहे अशी टीका त्यांनी केली.

विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस प्रत्येक जागेवर ताकदीने निवडणूक लढणार असून सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजपकडे मोठी ताकद असतानाही त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारांची घोषणा न केल्याने त्यांच्या मनात भीती असल्याचे दिसून येते. चंद्रपूर जागेवर शैलेंद्र अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून ते किसान सेलचे राष्ट्रीय सचिव तसेच अनेक राज्यांचे प्रभारी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री स्वतःचा डीएनए ओबीसी असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. ५० टक्क्यांवरील आरक्षणाच्या कारणावरून ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सरकार ओबीसीविरोधी असल्याचे स्पष्ट होते. ओबीसींच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि त्यातही काँग्रेस पूर्ण पाठिंबा देईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.