संसार थाटण्याआधीच काळाने घातला घाला; अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघातात हिंदुस्थानी वंशाच्या तरूणाचा मृत्यू
अमेरिकेतील जॉर्जियामध्ये घडलेल्या हेलिकॉप्टर अपघातात हिंदुस्थानी वंशाचे तरुण वैमानिक डेव्ह फिजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, लग्नाचे विधी पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही दुर्घटना घडल्याने आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकात बदलले. या अपघातातून त्यांची नवविवाहित पत्नी जेस्नी थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूळ केरळवासिय असलेले 26 वर्षीय डेव्ह फिजी हे डेल्टा एअर लाइन्समध्ये फर्स्ट ऑफिसर (सहवैमानिक) म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी त्यांचा आणि जेस्नीचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. दोघांची ओळख दहा वर्षांपूर्वी चर्चमध्ये झाली होती आणि दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर नवदांपत्य विशेष हेलिकॉप्टर प्रवासासाठी निघाले होते. रॉबिन्सन आर 66 हेलिकॉप्टरमधून ते डेकाल्ब-पीचट्री विमानतळाकडे जात होते. मात्र लग्नस्थळापासून काही अंतरावरच डॉसन काउंटीतील जंगल परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटसह डेव्ह फिजी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जेस्नी गंभीर जखमी अवस्थेत हेलिकॉप्टरच्या अवशेषांमध्ये अडकून पडली होती. बचाव पथकाने तिला शोधून काढेपर्यंत ती जवळपास सहा तास घटनास्थळीच होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. असे वृत्त एनडीटीव्ही वर्ल्ड ने दिले आहे.
डेव्ह यांचे वडील जॉर्ज फिजी यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणापूर्वी डेव्हला हवामानाबाबत चिंता वाटत होती. कमी दृश्यमानतेमुळे उड्डाण करणे धोकादायक ठरू शकते, असे त्याने हेलिकॉप्टरच्या पायलटलाही सांगितले होते. मात्र अधिक उंचीवरून उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जॉर्ज फिजी यांनी सांगितले की, शुद्धीवर आल्यानंतर जेस्नीने डेव्हला आपल्या जवळ पडलेले पाहिले. ती परिचारिका असल्याने तिला परिस्थितीची जाणीव झाली आणि डेव्हचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. या धक्क्यातून ती अजूनही सावरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने (NTSB) या अपघाताची चौकशी सुरू केली असून दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या जोडप्यावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी समुदायासह अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Comments are closed.