आरसीबीला दोनदा चॅम्पियन बनवूनही रजत पाटीदार टीम इंडियात दुर्लक्षित? जाणून घ्या नेमकं कारण
आयपीएल 2026 संपल्यानंतर टीम इंडिया आता एका नवीन प्रवासासाठी सज्ज होत आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 नंतर भारतीय संघात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना आता टीम इंडियामध्ये संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशीचे नाव आघाडीवर आहे. तसेच, आरसीबीला (RCB) सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रजत पाटीदारलाही (Rajat Patidar) चाहते टी20 संघात पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र, सध्या तरी त्याला संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे.
रजत पाटीदारने आयपीएल 2026 मध्ये आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. 15 सामन्यांत त्याने 192.96 च्या स्ट्राईक रेटने 501 धावा केल्या आणि 5 अर्धशतके झळकावली. तसेच, त्याचे नेतृत्वही अत्यंत प्रभावी ठरले.
सध्या भारतीय टी20 संघ अत्यंत मजबूत आहे आणि नुकताच त्यांनी वर्ल्ड कपही जिंकला आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे टॉप ऑर्डरमध्ये स्थिरावले आहेत, त्यामुळे निवडकर्ते सध्या तरी त्यात बदल करण्याच्या मनस्थितीत नाहीत. रजत पाटीदार आरसीबीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, परंतु टीम इंडियामध्ये सध्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर दीर्घकाळ चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सध्या संघाबाहेर काढणे योग्य ठरणार नाही. भविष्यात रिंकू सिंग संघातून बाहेर पडू शकतो किंवा हार्दिक पांड्या वनडे वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी20 सामने खेळणे कमी करू शकतो, परंतु रजत पाटीदारसाठी या नवीन भूमिकेत स्वतःला सामावून घेणे तितकेसे सोपे नसेल.
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash chopda) यांच्या मते, सध्या जरी संधी मिळाली नसली, तरी भविष्यात रजतला नक्कीच संधी मिळेल. चोपडा म्हणाले, निवडकर्ते भविष्यातील अनेक मालिकांसाठी खेळाडूंची निवड कशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रजत पाटीदारला पुढे जाऊन नक्कीच मधल्या फळीत (मिडिल ऑर्डर) संधी मिळू शकते. पण तो नेमकी कोणाची जागा घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Comments are closed.