नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपचे अमर राजूरकर उमेदवार; आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेड : राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी (Vidhan parishad) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपने रविवारी रात्री आपल्या 11 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. त्यामध्ये, नांदेडची (Nanded) जागा भाजपच्या वाट्याला आली असून भाजपकडून अमर राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमर राजूरकर हे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना महायुतीकडून ही उमेदवारी मिळाली. मात्र, येथील मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्या मुलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप आणि काँग्रेसला (Congress) आव्हान मिळालं आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अखेर आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार आहे. मात्र, जवळपास सर्वच मतदारसंघात काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केलीय, तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकाच जागेसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, प्रमुख लढत ही महायुतीचे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच होणार आहे. नांदेडमध्ये भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस मविआ अशी थेट लढत होणार आहे. भाजपकडून अमर राजूरकर यांना तिकीट देण्यात आलंय, तर काँग्रेसने रामदास पाटील यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, भाजप उमेदवाराल महायुतीमधील पक्षांनीच आव्हान दिलं आहे.
महायुतीमध्ये नांदेड विधानपरिषदेची जागा भाजपच्या वाट्याला आली असताना राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार प्रताप चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा नागेश आष्टीकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआचे काँग्रेस उमेदवार रामदास पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, अद्याप महाविकास आघाडीकडून अंतिम उमेदवार निश्चित नसल्याची चर्चा होत आहे. कारण, काँग्रेसकडून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि रामदास सुमठणकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने नेमकी ही जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, 4 जूनपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.