रवीना टंडनच्या आईच्या घरातून 25 लाखांचे दागिने, महागडी घड्याळे लंपास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रविनाच्या आईच्या वीणा टंडन यांच्या जुहू येथील निवासस्थानातून तब्बल 25 लाख रुपयांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात घरातील केअरटेकर महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय राशी छाब्रिया ही गेल्या काही वर्षांपासून वीणा टंडन यांची देखभाल करण्याचे काम करत होती. 2020 पासून ती टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती आणि घरातील विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखली जात होती. त्यामुळे तिला घरातील विविध भागांमध्ये वावराची परवानगी होती.

काही दिवसांपूर्वी घरातील लॉकरमधून सोन्या-हिऱ्यांचे दागिने तसेच दोन महागडी घड्याळे गायब झाल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सुरुवातीला राशी छाब्रियाने सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

तपासादरम्यान संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी राशीची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने लॉकरमधून दागिने आणि घड्याळे चोरल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जुहू पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणात चोरीस गेलेल्या काही घड्याळांचा शोध लागला असून उर्वरित दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीने चोरी केलेला ऐवज कुठे आणि कोणाला विकला याचाही तपास केला जात आहे. घरातील विश्वासू व्यक्तीकडूनच चोरी झाल्याने टंडन कुटुंबाला मोठा धक्का बसला असून या घटनेची बॉलिवूड वर्तुळातही चर्चा रंगली आहे. सध्या जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.