रश्मिकाने ‘कॉकटेल 2’साठी 15 कोटी मानधन घेतल्याची बाॅलिवूडमध्ये चर्चा…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये दमदार ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘पुष्पा’ मालिकेच्या यशानंतर तिची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर रश्मिकाच्या मानधनाबाबत एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, रश्मिका मंदाना आगामी ‘कॉकटेल 2’ या चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी रुपये मानधन घेणारी रश्मिका आता अनेक निर्मात्यांची पहिली पसंती बनली असून, तिच्या मानधनात मोठी वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या आकड्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

रश्मिकाच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला तो ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट. या चित्रपटानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर तिने दक्षिणेतील अनेक मोठ्या प्रोजेक्ट्ससह हिंदी चित्रपटसृष्टीतही यशस्वी पाऊल टाकले. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या ‘गुडबाय’मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर ‘मिशन मजनू’ आणि ‘ॲनिमल’सारख्या चित्रपटांमुळे तिची ओळख आणखी मजबूत झाली. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.

रश्मिका मंदानाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपटांमधून केली, परंतु ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने तिला लोकप्रियता आणि स्टारडम मिळवून दिले. त्यानंतर तिने अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘गुडबाय’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. GQ च्या एका अहवालानुसार, तिने या चित्रपटासाठी 4 कोटी रुपये घेतले होते. तिने तमिळ चित्रपट ‘वारिसू’ आणि हिंदी चित्रपट ‘मिशन मजनू’ साठीही 3 कोटी रुपये घेतले होते.

विशेषतः रणबीर कपूरसोबतच्या ‘ॲनिमल’च्या यशानंतर रश्मिकाची किंमत वाढल्याचे चित्रपटसृष्टीत मानले जाते. त्यानंतर ती अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांशी जोडली गेली. ‘पुष्पा 2’सह इतर प्रकल्पांमधील तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ‘कॉकटेल 2’ हा चित्रपटही प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये रश्मिका पहिल्यांदाच शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन यांच्यासोबत झळकणार आहे. नव्या जोडी आणि वेगळ्या कथानकामुळे चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. रश्मिकाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तिच्या मानधनात मोठी वाढ झाल्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.

Comments are closed.