डेडलाईन दोन दिवसांवर तरी ठाण्यातील नाले तुंबलेलेच, 11 कोटींची तरतूद, सफाई नेमकी झाली कुठे?
शहरातील सुमारे ३८४ किलोमीटर नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी ठाणे पालिकेने ११ कोटी ५० लाखांची तरतूद केली. पालिका प्रशासनाने एप्रिलमध्ये मोठा गाजावाजा करत नालेसफाई मोहिमेचा शुभारंभदेखील केला. दरम्यान नालेसफाईची डेडलाईन दोन दिवसांवर आली असताना ठाण्यातील बहुतेक नाले तुंबलेलेच आहेत. अनेक प्रमुख नाल्यांमध्ये कचरा, गाळ आणि राडारोडा तसाच असल्याने ‘नालेसफाई नेमकी कुठे झाली, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
घनकचरा विभागाने शहरातील नऊ प्रभाग समित्यांतर्गत येणाऱ्या नाल्यांची सफाई हाती घेण्यात आली आहे. १० एप्रिलपासून प्रत्यक्ष नालेसफाईला सुरुवात झाली होती. नालेसफाई मोहिमेचा शुभारंभ मुंब्रा येथील अमृतनगर नाल्यापासून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी मे अखेरपर्यंत सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते. तसेच नाल्यातून काढलेला गाळ तत्काळ उचलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत आहे.
या ठिकाणी कचऱ्याचे ढीग
कॅसलमिल नाका परिसरातील दोन्ही बाजूंचे नाले, वृंदावन सोसायटी-आनंद पार्क नाला, ऋतुपार्क नाला, संत ज्ञानेश्वरनगर, फुलेनगर नाला, राबोडी पोलीस ठाण्यासमोरील नाला तसेच मुंब्रा अमृतनगर, दिवा शहरातील नाले अस्वच्छ आणि अद्यापही नाल्यात कचऱ्याचे ढीग आणि राडारोडा साचल्याचे दिसत आहे. त्यामुळे नालेसफाईचे कोट्यवधी रुपये गेले तरी कुठे, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
Comments are closed.