लाडकी बहीण ते कर्जमाफी, फडणवीस-मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक; संजय राऊत यांचा घणाघात

राज्य शासनाने मंगळवारी 36 हजार 585 कोटी रुपयांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापैकी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी न देता केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेतच लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देतानाही किमान 2 वर्षे नियमित कर्जदार असण्याची कठीण अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींच्या घोषणा हा फसवणुकाचाच प्रकार असतो, असा टोला राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींच्या घोषणा हा फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा ही आमची मागणी सातत्याने राहिली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला समजून घ्यावा. पण आता लाडकी बहीण योजनेत फसवणूक, कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही लोकांना फसवताय. ही फसवणूक थांबणे फार गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून वसुली, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

कांद्याचा प्रश्नही गंभीर होत आहे, नाफेडकडून कांदा खरेदी केली जात होती. पण केंद्रीय वखार मंडळाने 50 टक्के कांदा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांनी फार कडवट भूमिका घ्यावी आणि भाजपला मतदान करू नये. मध्यंतरी मनमाडला अंबादास दानवे, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोर्चा निघाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदी-फडणवीसांच्या सभेला जाणे बंद केले तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील.

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढे बळ जरी नसले तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका आम्ही घेतली. त्यानुसार सातारा, कोकण, पुणे, विदर्भात नागपूर, यवतमाळ, मराठवाड्यात हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचे जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली.

Comments are closed.