‘व’ चा उच्चार इंग्रजीत V की W? 99 टक्के लोक आजही करतात ही चूक
इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो. मराठीतील ‘व’ या अक्षरासाठी इंग्रजीत नेमकं V वापरायचं की W? शाळेत शिकताना, फॉर्म भरताना किंवा सोशल मीडियावर नाव लिहिताना हा गोंधळ अनेकदा समोर येतो. विशेष म्हणजे बहुतेक लोक सवयीने स्पेलिंग लिहितात, पण त्यामागचा नियम फार कमी जणांना माहित असतो.
आपण रोज वापरत असलेले अनेक शब्द आणि नावे यामध्ये हा फरक दिसून येतो. उदाहरणार्थ Vikram, Vivek, Varsha या नावांमध्ये V वापरले जाते, तर Water, Window, Watch यांसारख्या शब्दांमध्ये W वापरले जाते. दोन्हींचा उच्चार मराठीत ऐकताना साधारण सारखाच वाटतो. मग हा फरक नेमका कशामुळे निर्माण होतो? याचे उत्तर उच्चाराच्या पद्धतीमध्ये दडलेले आहे. भाषाशास्त्रानुसार एखादा ध्वनी तयार करताना तोंडातील कोणते अवयव कसे काम करतात, यावरून त्याचे वर्गीकरण केले जाते.
V चा वापर कधी होतो?
जेव्हा एखादा शब्द उच्चारताना वरचे दात खालच्या ओठाला स्पर्श करतात, तेव्हा तयार होणाऱ्या ध्वनीसाठी V वापरले जाते. हा ध्वनी तुलनेने स्पष्ट आणि ठसठशीत असतो. Van, Voice, Village, Victory यांसारख्या शब्दांमध्ये हा नियम लागू होतो. हे शब्द उच्चारताना दात आणि ओठ यांचा संपर्क स्पष्टपणे जाणवतो.
W चा वापर कधी होतो?
W चा उच्चार करताना दात ओठांना स्पर्श करत नाहीत. त्याऐवजी दोन्ही ओठ थोडे गोलाकार होतात आणि ध्वनी मऊ स्वरूपात बाहेर पडतो. Water, Watch, Window, World यांसारख्या शब्दांमध्ये हा उच्चार ऐकायला मिळतो. शिट्टी वाजवताना जसे ओठ पुढे येतात, तशाच प्रकारची हालचाल येथे होते.
भारतीय नावांमध्ये का होतो गोंधळ?
भारतात अनेक नावांची इंग्रजी स्पेलिंग परंपरेनुसार निश्चित झाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी व्याकरणापेक्षा प्रचलित स्पेलिंग अधिक वापरले जाते. उदाहरणार्थ Vikas, Varsha, Vivek या नावांमध्ये V वापरले जाते. तर Pawar, Gaikwad, Swapnil यांसारख्या आडनावांमध्ये किंवा नावांमध्ये W चा वापर दिसून येतो.
हा नियम माहित असणं महत्वाचं
इंग्रजीमध्ये काही शब्दांमध्ये फक्त V आणि W बदलल्याने अर्थही बदलतो. उदाहरणार्थ Vest म्हणजे बंडी तर West म्हणजे पश्चिम दिशा. उच्चारातील छोटासा फरकही संभाषणाचा अर्थ बदलू शकतो.
Comments are closed.