ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांचे निधन
ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. नुकतेच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते.
पहलाज निहलानी यांनी नव्वदच्या दशकात बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. 1982मध्ये ‘हथकडी’ या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. निहलानी यांनी निर्माता म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांनी ‘आँखे’, ‘अंदाज’, ‘शोला और शबनम’, ‘तलाश’, ‘रंगीला राजा’, ‘मिट्टी और सोना’, ‘आग ही आग’, ‘गुनाहों का फैसला’ आणि ‘ज्युली 2’ यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सिनेसृष्टीसाठी हा एक मोठा धक्का आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे पहलाजजी यांचे निधन झाले आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पद भूषविले
पहलाज निहलानी यांनी 2015 ते 2017 या कालावधीत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. चित्रपटांमधील अश्लीलता, अपशब्द आणि हिंसाचारावर त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यांच्या काळात ‘उडता पंजाब’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटांच्या सेन्सॉरशिपवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
गोविंदा, चंकी पांडे यांना दिला ब्रेक
1986मध्ये त्यांनी ‘इल्झाम’ या सिनेमाद्वारे गोविंदाला तर ‘आग ही आग’ या सिनेमाद्वारे चंकी पांडेला या क्षेत्रात आणले. पुढे, गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आँखे’ सिनेमाची त्यांनी निर्मिती केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला.
Comments are closed.